आजारपणाला कंटाळून वृद्धाने केली पत्नीची हत्या, स्वतःच्याही आत्महत्येचा प्रयत्न

आजारपणाला कंटाळून 81 वर्षीय वृद्धाने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रेबीएल परेरा असे वृद्धाचे नाव असून अर्पिना परेरा (74) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

ग्रेबीएल परेरा हे त्यांची पत्नी, मुलगा व सून यांच्यासोबत सांडोर परिसरातील कराडी वाडी परिसरात राहत होते. मात्र ते व त्यांची पत्नी दोघेही वृद्धापकाळामुळे आजारांनी ग्रासलेले होते. याच नैराश्यातून ग्रेबीएल यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांचा मुलगा व सून जेवणासाठी नातेवाईकांकडे गेले असताना ग्रेबीएल यांनी धारधार चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या अंगावरही त्याच चाकूने वार करत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

मुलगा व सून घरी परतल्यानंतर त्यांनी दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी अर्पिना यांना मृत घोषित केले, तर ग्रेबीएल यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वसई पोलिसांनी ग्रेबीएल यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.