रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून वापरल्या जाणाऱ्या तिळाची शेती पूर्वी भात आणि नाचणीसोबत केली जायची. मात्र, आता ही परंपरा झपाट्याने लोप पावत असून, स्थानिक पातळीवर या शेतीच्या संवर्धनाची नितांत गरज भासत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तिळापासून तेल काढून अन्नात वापरण्याची पद्धत होती. हे तेल शुद्ध आणि गुणकारी समजले जाई. त्यामुळे शेतकरी घरातच तयार होणाऱ्या तेलामुळे स्वयंपूर्ण होते. सपाट भागावर तिळाचे झाडे फुलताना संपूर्ण परिसर पिवळसर फुलांनी सजलेला दिसे. आज मात्र तिळाची शेती हळूहळू मागे पडताना दिसत आहे. वाढते औद्योगीकरण, बदलते हवामान, आधुनिक शेतीच्या पद्धती आणि बाजारपेठेतील बदलते तांत्रिक निकष यामुळे या पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. पूर्वी भातशेतीबरोबर पूरक शेती म्हणून केली जाणारी तिळाची लागवड आता जवळजवळ थांबली आहे.

शेतीच्या या प्रकाराचे जतन न झाल्यास ही परंपरा काळाच्या ओघात नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन, कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तिळाच्या शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची आखणी करून शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत दिल्यास ही शेती टिकवणे शक्य आहे. ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे जतन करत पारंपरिक शेतीचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे.