करिअर सुरु होण्याआधीच ते उद्ध्वस्त झालेय! ”टीस’च्या विद्यार्थ्यांची कोर्टाकडून कानउघाडणी

माओवाद्यांशी संबंध असल्यामुळे तुरुंगवास भोगलेल्या दिल्लीतील दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘टीस’च्या विद्यार्थ्यांची मुंबई सत्र न्यायालयाने कठोर शब्दांत कानउघाडणी केली. तुम्ही करिअरच्या सुरुवातीलाच घोडचूक केली आहे. करिअर सुरु होण्याआधीच तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. तुमचे नाव गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. केवळ इथल्याच पोलिसांकडे नव्हे, तर संपूर्ण देशभरातील पोलिसांकडे तुमची गुन्हेगार म्हणून नोंद झाली आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शास्त्रज्ञ वा इंजिनिअर असाल, पण हेही लक्षात घ्या की आजकाल इंजिनिअर्सनाही नोकऱ्या नाहीत, अशा शब्दांत सत्र न्यायाधीशांनी ‘टीस’च्या विद्यार्थ्यांना फटकारले.

दिवंगत प्रा. जी. एन. साईबाबा हे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी देवनार येथील ‘टीस’चे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अटकेच्या कारवाईची टांगती तलवार उभी राहिल्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

विद्यार्थ्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेताना सत्र न्यायालयाने अर्जदार विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. याचवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या फौजदारी कृत्यातील सहभागाबाबत खडे बोल सुनावले. फौजदारी कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर होणाऱ्या परिणामांबद्दल सत्र न्यायालयाने चिंता व्यक्त केली आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना विचारणा केली. “तुमच्यापैकी किती जण महाराष्ट्राबाहेरील आहेत? तुम्ही या सगळ्यासाठी महाराष्ट्रात शिकायला आला आहात का? तुमच्या वडिलांना या प्रकरणाबद्दल माहिती आहे का? तुमच्यापैकी किती जणांचे वडील सरकारी नोकरीत आहेत? या प्रकरणामुळे तुम्हाला सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत,” असे न्यायाधीश म्हणाले.

न्यायालयाने फौजदारी नोंदीच्या दूरगामी परिणामांचा उल्लेख केला. फौजदारी कारवाईचे परिणाम केवळ सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत, खाजगी नोकरीतही उमेदवारांना प्रलंबित फौजदारी प्रकरणांची माहिती देणे आवश्यक असते, असे न्यायालयाने नमूद केले. “तुमच्या नावावर गुन्हेगारीची नोंद झाली आहे. ही नोंद केवळ येथेच नाही, तर देशभरातील पोलिसांकडे आहे. करिअर सुरू होण्यापूर्वीच तुम्ही इतकी मोठी चूक केली आहे, तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे,” असे न्यायाधीश म्हणाले. तसेच त्यांच्या रोजगाराच्या संधीबद्दलही न्यायालयाने शंका व्यक्त केली. तुम्ही शास्त्रज्ञ किंवा अभियंते आहात? अभियंत्यांनाही नोकऱ्या नाहीत. या परिस्थितीत तुमच्या पदव्या तुम्हाला नोकरी मिळवून देण्यास मदत करणार नाहीत, असे न्यायालयाने पुढे नमूद केले.

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांना तुरुंगवास झाला होता. 12 ऑक्टोबर, 2024 रोजी, यूएपीए प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे साईबाबा यांचे निधन झाले. त्यांनी जवळपास 10 वर्षे नागपूर मध्यवर्ती कारागृहात घालवली होती.