बनावट हॉलमार्किंगच्या बांगड्या गहाण ठेवून सात सराफांना गंडा, फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

बनावट बांगड्यांवर 75 टक्के शुद्धतेचे हॉलमार्किंग करून धारावी परिसरातील सात सराफांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना मथुरा येथून पकडण्यात आले. या गुन्ह्यात पाच लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

धारावी मुख्य रस्ता व 90 फिट मार्गावरील एकूण सात सराफांची गुलजार नईम खान याने त्याचे सहकारी फईम व राजकुमार यांच्याशी संगनमत करून फसवणूक केली. या भामट्यांनी त्यांच्याकडील बांगड्यांवर 75 टक्के शुद्धतेचे हॉलमार्किंग करून त्या सोन्याच्या असल्याचे भासवल्या व त्या सात सराफांकडे गहाण ठेवून 10 लाख 65 हजार रुपये किंमतीची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सातही सराफांनी धारावी पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, पोलीस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद साळोखे तसेच गाडेकर, अनपट व भोसले या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पथकाने आधी गुलजार खान याला पकडले. त्याच्या चौकशीत उर्वरित दोन आरोपी त्यांच्या गावाच्या दिशेने पळून जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता आरोपी देहरादून एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार साळोखे यांनी तत्काळ मथुरा पोलिसांशी संपर्क साधून राजकुमार आणि रफिक या दोघांना ताब्यात घेण्यास सांगितले.  

फोटो पाठवून उचलले

साळोखे यांनी मथुरा पोलिसांना दोन्ही आरोपींचे फोटो पाठवले. त्यानुसार देहरादून एक्स्प्रेस मथुरा स्थानकात पोहोचताच तेथील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर साळोखे व त्यांच्या पथकाने तेथे जाऊन दोघांना पकडून आणले. या आरोपींनी अशाप्रकारे अजून कोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.