स्वातंत्र्यदिनी राज्यात सात ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न, महायुती सरकारविरोधात जनआक्रोश

राज्यात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर दुसरकडे पंत्राटदारांची थकीत देयके, पगार वेळेवर दिला जात नाही, अतिक्रमण काढण्यापासून ते जमिनीचा वाद याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने महायुती सरकारच्या विरोधात जनआक्रोश वाढू लागला आहे. स्वातंत्र्यदिनी राज्यात बुलढाणा, धुळे, सोलापूर, फलटण, इंदापूर, वर्धा आणि मुंबई आदी सात ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.

 बुलढाण्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

गावातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठा बुलढाणा जिह्यातील आंधरुड येथील शेवंताबाई बनसोडे या महिलेने ध्वजारोहणापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला.

धुळ्यात मुलीवरील अत्याचाराविरोधात आंदोलन

धुळे शहरातील जिजामाता लेडीज हॉस्टेलमध्ये मुलीवर होत अत्याचाराच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अंगावर ज्वलनशील पदार्थ टापून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीला हॉस्टेलमध्ये घरकाम करण्यास सांगितले जात होते आणि नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात आली. यामध्ये मुलीचा हात फॅक्चर झाला, असे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे.

मंत्रालयासमोर नाशिकच्या युवकांचे आंदोलन

नाशिकच्या अंबडमधील अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणारे आंदोलकांनी स्वातंत्र्यादिनी मंत्रालयाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकानी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहनाचा प्रयत्नही केला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेतले. घोषणाबाजी करणाऱयांकडून पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. नाशिक महानगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमण झालेल्या तब्बल 130 पंपन्यांविरोधात गेल्या नऊ महिन्यांपासून आम्ही तक्रार करत आहोत, मात्र सरकार कारवाई करत नाही. उद्योग मंत्री फक्त खोके घेण्यासाठी येतात, असा आरोप आंदोलकांनी केला.

फलटण तहसील कार्यालयात राजाळे येथील निखिल निंबाळकर या युवकाने अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी त्यास वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. निखिल निंबाळकर हा युवक अनेक महिन्यापासून अतिक्रमित रस्त्याच्या प्रश्नासाठी लढा देत आहे.

सोलापुरात स्वांतत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा केला प्रयत्न केला. गौरव पवार असे या तरुणाचे नाव असून, तो सोलापूर शहरातील विणकर सोसायटी येथील रहिवाशी आहे. या तरुणाला सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्मदहनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

जमिनीच्या वादावरून  इंदापूरमधील प्रशासकीय भवनाच्या आवारात ध्वजवंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावरती पेट्रोलसदृश पदार्थ ओतून घेत आत्मदानाचा प्रयत्न केला. आपल्या पुटुंबावर अन्याय होत असून, धनदांडगे ही जमीन लुटत असल्याचा आरोप पूजा शिंदे केला आहे.

वर्ध्यात पगार थकल्याने आत्मदहन

वर्धा जिह्यात शहरातील आरती चौकात पगार थकल्याने गटसचिव जितेंद्र तरासे आणि महेंद्र ठापूर या दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दीर्घकाळ पगार न मिळाल्याने वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

थकीत बिलासाठी पंत्राटदाराचे टोकाचे पाऊल

पंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले थकली आहेत. सरकारकडे पाठपुरावा करूनही थकीत बिलाचे पैसे मिळत नसल्याने वर्ध्यातील पंत्राटदार बाबा जाकीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्महदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखले.