पुण्यात एका बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आई वडिल भांडत होते म्हणून हा मुलगा बाहेर पडला. तेव्हा बिबट्याने या मुलावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यात वाघेश्वर गुळ कारखान्यात एक मजूर दाम्पत्य काम करत होतं. हे दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांना सात वर्षांचा मुलगा होता. या मुलाचे नाव वंश सिंह असे होते. ऊसाच्या शेताजवळ हे कुटुंब राहत होते.
शुक्रवारी वंशच्या आई वडिलांचे घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे वंश अस्वस्थ झाला आणि घराबाहेर पडला. तेव्हा ऊसाच्या शेताजवळ बिबट्या होता. त्याने वशंवर हल्ला केला आणि त्याला फरफटत नेले. या हल्ल्यात वंशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वशंचा मृतदेहश शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.