गटाराच्या पाण्यापासून बनवलेली बिअर स्वीडनवाले गटागट पितायत

3002

गटाराच्या घाण पाण्याला येणारा वास आणि त्याचा रंग पाहून अनेकांना उलटी येते. स्वीडनमधली माणसं मात्र याच गटारातील पाण्यापासून बनवलेली बिअर मिटक्या मारत पीत आहेत. ऐकायला हे किळसवाणं वाटत असलं तरी हे खरं आहे. ही बिअर इतकी प्रसिद्ध झाली आहे की विचारू नका. गटाराच्या पाण्यापासून बिअर बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये कार्ल्सबर्ग आणि न्यू कार्नेजी ब्रुअरी या सामील झाल्या आहेत.

IVL या स्वीडनमधल्या पर्यावरण संशोधन करणाऱ्या संस्थेने गटाराचं पाणी शुद्ध करण्याची आणि ते बिअरसाठी वापरण्याची पद्धत तयार केली आहे. या पाण्यापासून प्युअरेस्ट नावाची बिअर तयार करण्यात आली. ही बिअर तिथे मे महिन्यात बाजारात आणण्यात आली आणि आता तिचा खप 6 हजार लिटरपर्यंत पोहोचला आहे. आयव्हीएलच्या तज्ज्ञ रुपाली देशमुख यांनी इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की गटाराचे पाणी प्रक्रिया केल्यानंतर इतके शुद्ध होते की त्यामध्ये बिअरनिर्मितीसाठी मीठ घालावे लागते. देशमुख यांनी सांगितले की आयव्हीएल दारु विकत नाही मात्र गटाराचे पाणी पिण्यासाठी योग्य करता येऊ शकते हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या म्हणाल्या की आजही गटाराच्या पाण्याबाबत आपल्या मनात शंका असतात ज्या दूर करण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रक्रिया केलेले पाणी पिण्याला विरोध होत असतो. हा विरोध दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं आयव्हीएलने म्हटलं आहे. समस्या ही प्रक्रिया केलेले पाणी पिणे ही नसून लोकांच्या मनात निर्माण झालेली अढी असल्याचं या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक स्टॅपन फिलीपसन यांनी म्हटलं आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते बिअरसाठी वापरण्याची कल्पना ही आमच्या डोक्यात ती दीड वर्षांपूर्वी आली असल्याचंही ते म्हणाले. दीड वर्षांपूर्वी आम्ही आयव्हीएलच्या प्रकल्पामध्ये पाण्यावर प्रक्रिया केली आणि शुद्ध केलेलं पाणी न्यू कार्नेजी ब्रुअरी या बिअर बनवणाऱ्या कंपनीला पाठवलं. तिथे या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून बिअर तयार करण्यात आली होती आणि तिथून प्युअरेस्ट या बिअर ब्रँडच्या निर्मितीला सुरुवात झाली असं फिलीपसन यांनी सांगितले आहे. ही बिअर आता इतकी प्रसिद्ध झाली आहे की बाजारात आणल्याच्या काही दिवसांतच ती संपली. सगळा स्टॉक संपल्याने काही दिवस ही बिअर बाजारातून गायब झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी ती बाजारात पुन्हा आणण्यात आली आणि आता देखील बिअरचा सगळा स्टॉक संपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या