
शिवडीच्या बीडीडी चाळीत राहणाऱया एका 63 वर्षीय वृद्धासोबत अनुचित प्रकार घडला. भाजी घेऊन घरी परतत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला. त्या मोबाईलचा वापर करून अज्ञात आरोपींनी त्यांच्या दोन बँक खात्यातून साडेसहा लाख रुपये वळते केले. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय म्हात्रे 1 मे रोजी नेहमीप्रमाणे प्लाझा मार्पेट येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतल्यावर मोबाईल सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते अलिबागला गावी गेले. तेथे ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोयनाड शाखेत गेले तेव्हा त्यांच्या त्या खात्यातून 1 ते 3 मेच्या दरम्यान एक लाख 49 हजार रुपये अन्य बँकेत वळते केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मुंबईला येऊन त्यांच्या शिवडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन विचारपूस केली असता 2 ते 7 मे या कालावधीत त्या खात्यातील चार लाख 93 हजार रुपये अन्य बँक खात्यात वळते झाल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे म्हात्रे यांच्या दोन बँक खात्यांवर डल्ला मारत अज्ञात आरोपींनी त्यांचे सहा लाख 62 हजार रुपये अन्य बँक खात्यात वळते केल्याचे समोर आले. म्हात्रे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.