कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी देश हादरला असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच या घटनेवर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता येथील घटना लाजिरवाणी असून निर्भयाच्या घटनेनंतरही काही सुधार झाला नाही. त्यामुळे महिला सुरक्षा ठोस करण्यासाठी पितृसत्ताक मानसिकता संपविण्याची करण्याची गरज असल्याचे मत शबाना आझमी यांनी व्यक्त केले.
शबाना आझमी बुधवारी संध्याकाळी संयुक्त राष्ट्र बाल कोषच्या सहयोगाने पुणे येथील ग्रेविटास फांऊंडेशनद्वारा आयोजित मुलांसाठी एक सुरक्षित विश्व निर्माण या विषयावर गोलमेज परिषदेत सहभागी झाले. येथे त्यांनी कोलकाता डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याबरोबरच महाराष्ट्रातील बदलापूरच्या शाळेतील दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले यावर विचारण्यात आले. ‘अशा घटनांविरोधात राग असायला हवा, आजच नाही तर हा राग खूप पूर्वी व्हायला हवा होता. आणि ते केवळ एका प्रकरणात राजकीय आहे म्हणून निवडक नसावे… या सर्व घटना अत्यंत धोकादायक आहेत. जर आपण या घटनांकडे निवडकपणे पाहत राहिलो तर आपण मुळापर्यंत पोहोचू शकणार नाही. हे सर्व अत्यंत लज्जास्पद आहे’, असे शबाना म्हणाल्या.
लोकांची पितृसत्ताक मानसिकता संपवण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले. 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर लैंगिक छळाच्या घटनांमध्ये कोणतीही घट झाली नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.