
शहापूरमधील सीबीएससी बोर्डाच्या दमानी शाळेत तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी शाळेवर धडक देऊन संताप व्यक्त केला आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून प्राचार्यांसह पाच आरोपींची उचलबांगडी केली आहे.
दमानी शाळेतील शौचालयामध्ये रक्ताचे डाग दिसल्याने प्राचार्या आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सहावी ते दहावीतील सुमारे सवाशे विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी केली. हा प्रकार अनेक विद्यार्थिनींनी रडत रडत आपल्या घरी सांगितला. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. संतप्त पालकांनी शाळेसमोर व पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून प्राचार्यांना निलंबित करून प्राचार्यांसह हे कृत्य करणाऱ्यांना अटक करा अशी जोरदार मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्राचार्या व महिला कर्मचाऱ्याला बुधवारी अटक केली होती. आज अन्य तीन शिक्षिकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज शाळेला भेट देऊन याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला.
शाळेत आज होणार संयुक्त बैठक
प्राचार्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, बालकल्याण समिती, जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती व पालक यांची संयुक्त बैठक दमानी शाळेत शुक्रवारी बोलावण्यात आली असून त्यामध्ये पालकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.