
एकीकडे सरकार ‘आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी’ अशा घोषणा करत असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूरकरांना अक्षरशः रोजच ‘सलाइन’वरचे जीवन जगावे लागत आहे. रस्ताच नसल्याने वरसवाडीतील एका महिलेला मध्यरात्री झोळीतून रुग्णालयात न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमची या नरकयातनेतून सुटका कधी होणार? असा टाहो वरसवाडीसह या परिसरातील 65 गावांतील ग्रामस्थांनी फोडला आहे.
शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यात जाण्यासाठी मुख्य रस्ते नसल्याने आजही येथील आदिवासी बांधवांना ठेचकळत, कसरत करून ये-जा करावी लागत आहे. फुगाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वरसवाडीतील महिला मंदाबाई आघाण (वय – 52) यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. वेळेत रुग्णालयात दाखल केले नाही तर महिलेच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती होती. अखेर येथील गावकऱ्यांनी बांबूला चादर बांधून झोळी तयार केली. या झोळीतून मंदाबाई यांना पाच किलोमीटरचा प्रवास करून इगतपुरीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.
कोळीपाडा, तळ्याचीवाडी, कातकरी वस्ती, फर्जनवाडी, कोठावाडी, भितारवाडी, चाफेवाडी, साखरवाडी, पाटीचा माळ, कृष्णाची वाडी, सोनार शेत, देवीचा पाडा, लोभीपाडा, पेढ्याचा पाडा, पाटीलवाडी, वारलीपाडा, माळीपाडा, हेदूपाडा, जांभुळपाडा, आल नपाडा, भरवपाडा आदी 65 गावपाड्यांना जोडणारा मुख्य रस्ताच नाही.
“फुगाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वरसवाडी ते आघाण वाडी या जोडरस्त्याच्या कामासाठी पंचायत समितीत 31 जुलै 2023 रोजी ग्रामपंचायतने ठराव करून लेखी पत्र दिले होते. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आजही आदिवासी बांधवांच्या नशिबी झोळीतील जीवघेणा प्रवास आहे.”
रामा आघाण, स्थानिक नागरिक