शनी मंदिराच्या विश्वस्तांना नोटिसा; आज सुनावणी

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या ऑनलाइन बनावट ऍप घोटाळा, नोकरभरती गैरव्यवहार, देणगी पावती हेराफेरी यांसह घोटाळ्याची मालिका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शनी मंदिराच्या अकरा विश्वस्तांना नोटिसा बजावल्या असून, शुक्रवारी (दि.18) मुंबई येथे धर्मादाय कार्यालयात सुनावणी होणार आहे.

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान गैरकारभार गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात गाजत आहे. शनी महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्य आणि विदेशातूनही भाविक येत असतात. हे भाविक देवस्थानला दान देतात. यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. देवस्थानात येथील विश्वस्त मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱयांकडून प्रचंड अनागोंदी व अनियमित कारभार समोर आला आहे.

पब्लिक ट्रस्टच्या नावाखाली विश्वस्तांना अधिकार असल्याचा या गोंडस नावाखाली भ्रष्टाचाराने शनी मंदिर पोखरले गेले आहे. भाविकांच्या पैशांची उधळपट्टी, मनमानी कारभार यासंदर्भात विविध तक्रारी सातत्याने वाढल्याने शनिशिंगणापूर देवस्थान राज्याच्या मुख्य केंद्रस्थानी आले आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत विविध चौकश्या सुरू होत्या. मात्र, नगरच्या सहायक धर्मादायुक्तांनी विश्वस्तांना वेळोवेळी क्लीन चिट दिल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केला. त्यांनी दिलेल्या फेरचौकशीअंती मिळालेल्या अहवालानुसार विश्वस्तांची अनियमितता व गैरकारभार केल्याचा मुद्दा अधिवेशनात गाजला.

2022-23 यावर्षी तब्बल 2 हजार 447 हून अधिक नोकरभरतीमध्ये जवळच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नावावर बँक अकाऊंट उघडून देवस्थानचा पैसा वळवल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभेत समोर आला. अहवालात गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहार आदी बाबींच्या अनुषंगाने देवस्थानच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

दरम्यान, अलीकडे शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावे ऑनलाइन बनावट ऍपच्या महाघोटाळ्यात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, विश्वस्त मंडळाकडून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी येथील महाघोटाळ्यात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच विश्वस्त मंडळाकडून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी येथील शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांच्यासह अकरा विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांनी नोटिसा दिल्या आहेत. शुक्रवारी (दि.18) मुंबई येथे धर्मादाय कार्यालयात समक्ष अगर वकिलामार्फत हजर राहून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांची पहिल्यांदाच मुंबईत चौकशी होत असल्याने, आगामी काळात विश्वस्तांवर काय कारवाई होते? या सुनावणीकडे संपूर्ण अहिल्यानगर जिह्याचे लक्ष लागले आहे.

जिह्याच्या नावात मोडतोड

मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने देवस्थानच्या विश्वस्तांना नोटिसा बजावताना अहिल्यानगर जिह्याचे नाव ‘अहमदनगर’ तसेच विश्वस्तांच्या नावे पत्ता टाकताना ‘आलियानगर’ करून जिह्याच्या नावाची मोडतोड केली आहे. या नावावरून धर्मादाय कार्यालय जिल्हा, तालुक्यांच्या नावाबाबत किती सजग आहे, हे यावरून दिसून येते.