Video – गोविंदबागेत 17 जानेवारीला झालेली गुप्त बैठक; शरद पवार, अजित पवारांसह प्रमुख नेते होते उपस्थित

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुतीत उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला असून शनिवारी सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनीही बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. अशातच 17 जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची गोविंदबाग येथे गुप्त बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. मधल्या काळात महानगरपालिका निवडणूक होऊन गेली. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका होणार असून यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. ही निवडणूक आणि विलीनीकरणाबाबत बारामतीतील गोविंदबाग येथे दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. 17 जानेवारी रोजी ही बैठक झाली होती.

या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार आणि अमोल कोल्हे उपस्थित होते. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ दिसत नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.