पार्थसोबत काय चर्चा झाली? खुद्द शरद पवारांनी सांगितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काल अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली असे आधी प्राथमिक वृत्त होते. पण पार्थसोबत अशी चर्चाच झाली नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की, पार्थ पवार हे त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि ती भेट अजित पवार यांच्या स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील चर्चेसाठी होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, पुढील काळात सुनेत्रा पवार यांनी बारामती आणि महाराष्ट्रातच राहून काम करणे आवश्यक आहे. तसेच, त्या आता राज्यसभेच्या सदस्या नसल्याने त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार करणार नाहीत. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळातील निवडणुकांमध्ये सर्व उमेदवार ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवतील का, या प्रश्नावर शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत स्पष्ट उत्तर देणे टाळले.

स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित राजकीय घडामोडींवर बोलताना शरद पवार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात मी थेट सहभागी नव्हतो. या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मी अजित पवार यांना सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व राजकीय समीकरणे अजित पवार स्वतः पाहत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.