‘बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसला आहे. राज्यातील महिला-भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. परंतु राज्य सरकारला कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही. यामुळे बदलापूरचा प्रकार घडला. महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी दररोज घडत आहेत. त्यामुळे महिला व भगिनी अत्याचाराला बळी पडत आहेत,’ असे खडेबोल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून मिंधे सरकारला सुनावले.
बदलापूरच्या घटनेविरोधात पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, स्वाती ढमाले, शहर संघटिका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख उल्हास शेवाळे, प्रशांत राणे, नीलेश जठार, प्रशांत बधे, विशाल धनवडे, शरद कारवेकर, कविता आंब्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आदी सहभागी झाले होते.
शरद पवार म्हणाले, ‘हे राज्य शिवछत्रपतींचे आहे. शिवछत्रपतींच्या राजवटीत अशाच एका महिला भगिनीवर अत्याचार झाला होता. त्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जे काही घडत आहे, त्याची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे.’
सरकार असंवेदनशील
‘सरकार व त्यांचे सहकारी बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप करीत आहेत. हे लोक मुलीबाळींवरील अत्याचारांविरोधात आवाज उठविण्याला राजकारण म्हणत असतील तर सरकार किती असंवेदनशील आहे, हे स्पष्ट होते. महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, याची प्रचीती त्यातून दिसून येते. महाराष्ट्रात जे काही घडले ते घडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. आणि ज्यांनी घडविले त्यांचा तीव्र निषेध सर्वांनी केला पाहिजे,’ असेही शरद पवार म्हणाले.
आरोपीला फाशी मिळेपर्यंत कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत!
‘आपल्याला गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी पीडित मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला सुरुवात करूया. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत,’ असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बदलापूर आंदोलनात सहभागी झालेले लोक बाहेरचे होते, असे सरकार म्हणत आहे. परंतु लोक कोणीही असोत, ते हिंदुस्थानी होते आणि बदलापूरच्या लेकींसाठी एकत्र आले होते. हे सरकार असंवेदनशील आहे. इतके गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही. पुण्यामध्ये पोलीस यंत्रणेकडून रक्ताचे नमुने बदलणे, ड्रग्ज प्रकरणात अटकेतला आरोपी पळून जातो, अशा अनेक घटना दुर्दैवाने राज्यात आणि पुण्यात होत आहेत,’ असा टोला महायुती सरकारला लगावला.