पाकिस्तानशी संघर्षात अमेरिकेची मदत का घेतली? शरद पवार यांचा सवाल

पाकिस्तानसोबतच्या संघर्षात अमेरिकेची मदत घेण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न विचारला तर पेंद्र सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नमूद करतानाच आमचे मुद्दे आम्ही सोडवू, तिसऱया देशाचा हस्तक्षेप चालणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. शिमला करारानुसार हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील प्रश्नांमध्ये इतर कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. कारण संरक्षणाशी संबंधित माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे तर बोलवा, त्यापेक्षा सर्वपक्षीय बैठक बोलवून संरक्षण अधिकाऱयांकडून त्यात माहिती देण्यात यावी, असे शरद पवार म्हणाले.

शिमला करार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार भुत्तो यांच्यात झाला होता. त्यात दोन्ही देशांनी आपल्यातील प्रश्नात तिसऱया देशाचा हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही यावर शिक्कामोर्तब केले होते. आता पहिल्यांदाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी सार्वजनिकरीत्या शस्त्रसंधी जाहीर केली, हे ठीक नाही.