
राज्यसभेवर बिनविरोध फेरनिवड झालेले ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 19 जणांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 59 वर्षे पूर्ण झाली असून आजच्या शपथविधीच्या निमित्ताने त्यांनी राजकीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे हादेखील अनोखा विक्रमच मानला जातो. राज्यसभेत सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शपथविधी समारंभात राज्यसभेचे महासचिव प्रमोद चंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी शरद पवार यांच्या बरोबरच भाजपचे रामराव वडकुते आणि शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनीही राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. #sharadpawar pic.twitter.com/DzsfcqMBgh
— Saamana Online (@SaamanaOnline) April 6, 2026
तत्पूर्वी शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी राष्ट्रवादीचे खासदार व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, भास्कर भगरे, बाळूमामा म्हात्रे, बजरंग सोनवणे, अमर काळे व धैर्यशील मोहिते-पाटील या वेळी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील ‘महाभियोग’ फेटाळला
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज फेटाळला. या प्रस्तावावर लोकसभेतील 130 आणि राज्यसभेतील 63 असे मिळून 193 खासदारांच्या स्वाक्षऱया होत्या. 12 मार्च रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.



























































