शरद पवार यांच्या भाषणादरम्यान बॅनर कोसळला; कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक जिल्ह्यातील सटाणामध्ये प्रचार सभा झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेवेळी अचानक वादळी वारे सुरू झाले. यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. त्यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळी वारे सुरू झाले. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. वारे वेगाने वाहू लागल्याने व्यासपीठावरील शरद पवार यांच्या पाठीमागे असलेला बॅनर डळमळीत झाला आणि हा बॅनर कोसळला. पण उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तो पकडल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. कुणालाही इजा झाली नाही. बॅनर कोसळल्याची घटना लक्षात आल्यावर शरद पवार यांनीही आपले भाषण आटोपते घेतले.

‘मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही’

यावेळी शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात सध्या मोदी राज्य आहे. विविध जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता, त्यांच्यावर कांदा निर्यातबंदी उठवण्याची जबाबदारी असते. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते. शरद पवार होश मे आवो… अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी मी दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यातबंदी उठवली होती. आताच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कांद्या, द्राक्ष, डाळींबाला भाव नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. द्राक्ष, डाळिंबाला भाव दिले, असे मोदी म्हणातात. पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करतात, असा जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला.

मोफत धान्य देण्याची घोषणा करतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढवतात. हा देश धान्य निर्यात करणारा होता. आता आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही फुकट धान्य देतो अशा गप्पा मारू नका, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.