
मुंबई शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला. अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोमधील व्यापार युद्धामुळे सेन्सेक्स तब्बल 319.22 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून तो 77,186 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 121.10 अंकांची किंवा 0.52 टक्क्यांची घसरण होऊन तो 23,361.05 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.
लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयटीसी, पावर ग्रीड, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसली, तर बजाज फायनान्सच्या शेअर्सचे भाव 5 टक्क्यांनी वधारले. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, भारती एयरटेल आणि मारुती या कंपन्यांच्या शेअर्सनीही भाव खाल्ल्याचे चित्र होते.
भागभांडवल घटले
शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात 5 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले. बीएसईवर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांचे भागभांडवल साडेपाच लाख कोटी रुपयांनी घसरून 419.49 लाख कोटी रुपये इतके झाले.
व्यापारयुद्धाचा परिणाम
अमेरिकेने चीन, मेक्सिको आणि कॅनडावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. परिणामी परकीय गुंतवणूकदारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा ट्रेंड वाढल्याचे मेहता इक्विटीज लिमिटेडच्या संशोधन विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले. अमेरिका आणि इतर राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे समोर आले आहे.
सबसे घटा रुपया!
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया 55 पैशांनी घसरून 87.17 या सार्वकालीन नीचांकी पातळीवर स्थिरावला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त आयात शुल्कवाढीचा परिणाम रुपयावरही दिसला. पुढील दोन महिन्यांत रुपया आणखी घसरू शकतो, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. भविष्यात हिंदुस्थानवरही अतिरिक्त आयात शुल्क लादले जाऊ शकते, अशी भीती बाजारात आहे. यंदा पहिल्यांदाच रुपयामध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.