Share Market News – युद्धाचा तडाखा वाढला, शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 400 अंकांनी घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध तिसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. तसेच आता युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती वाढत आहे. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. तसेच शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून येत आहे. सोमवारी व्यवहराच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. या घसरणीने सेन्सेक्स ७४,००० च्या खाली गेला तर निफ्टीनेही २२,८०० ची पातळी तोडली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स ७४,५३२.९६ वरून ८००.३८ अंकांनी म्हणजेच १.०७ टक्क्यांनी घसरून ७३,७३२.५८ वर उघडला. तर निफ्टी २३,११४.५० वरून २९०.१५ अंकांनी किंवा १.२६ टक्क्यांनी घसरून २२,८२४.३५ वर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतरही बाजारातील घसरण सुरुच राहिली. 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1297.82 अंकांनी म्हणजेच 1.74 टक्क्यांनी घसरून 73,247.48 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 412.80 अंकांनी म्हणजेच-1.79% घसरून 22,710 . 85 वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही 1,259.60 अंकांची म्हणजेच 2.36% घसरण होत तो 52,174 . 50 वर व्यवहार करत होता.

मुंबई शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स घसरणीत असून, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, टायटन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. या शेअर्समध्ये २.४ टक्के ते ३.२५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

सोमवारी बाजार उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. परदेशातून आलेल्या नकारात्मक संकेतांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम झाला. युद्धाची तीव्रता वाढली तर बाजारातील अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.