
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पनामा येथे विधानसभा अध्यक्ष डाना कास्टानेडा यांची भेट घेतली. यावेळी थरूर यांनी हिंदुस्थानची दहशतवादविरोधी ठाम भूमिकेची माहिती देताना पाकिस्तानवर कडाडून टीका केली. ते म्हणाले आहेत की, हिंदुस्थानला शांतता हवी, परंतु पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्याने हिंदुस्थानला कठोर पावले उचलावी लागत आहेत.
थरूर यांनी पनामाच्या विधानसभेत बोलताना 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले त्यांचे मुख्यालये उद्ध्वस्त केली. थरूर यांनी ठामपणे सांगितले की, हिंदुस्थानला युद्ध नकोय, पण दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय सोडता येणार नाही.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, थरूर म्हणाले की, “पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांना सतत प्रोत्साहन देत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर पाकिस्तानने कोणतीही कारवाई न केल्याने हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले.”