Shikhar Dhawan – गब्बरचं पॅकअप! शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

क्रिकेटमध्ये गब्बर या नावाने प्रसिद्ध असणारा टीम इंडियाचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन याने क्रिकेटला रामराम केला आहे. शनिवारी सकाळी त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर एक भावूक व्हिडीओ शेअर करत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

शिखर धवन याने 1 मिनिट 17 सेकंदाचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केला आहे. “माझ्या क्रिकेटच्या प्रवासाचा अध्याय इथेच थांबवत असून माझ्यासोबत मी असंख्या आठवणी सोबत घेऊन पुढे जात आहे. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि पाठींबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद!”, असे कॅप्शन या व्हिडीओला शिखरने दिले आहे.

सर्वांना नमस्कार… आज मी एका अशा वळणावर उभा आहे जिथून मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त आठवणी दिसतात अन् पुढे पाहण्यासाठी संपूर्ण जग आहे. टीम इंडियाकडून खेळणे हेच माझे लक्ष्य होते आणि मी खेळलोही. यासाठी मी माझे कुटुंब, लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा, ज्यांच्याकडे मी क्रिकेटचे धडे गिरवले ते मदन शर्मा यांचा आभारी आहे, असे शिखर धवन म्हणाला.

कथेत पुढे सरकण्यासाठी पानं उलटणे गरजेचे असते, असे म्हणत शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने बीसीसीआय, डीडीसीआय आणि चाहत्यांचेही आभार मानले.

दरम्यान, शिखर धवन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. निवृत्तीवेळी त्याने आयपीएलचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तो आगामी काही वर्ष इथे धावांचा पाऊस पाडताना दिसेल अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या हंगामातही तो पंजाब किंग्जकडून खेळला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले होते.

कारकिर्द

शिखर धवन टीम इंडियाकडून 34 कसोटी, 167 वन डे आणि 68 टी20 सामने खेळला. यात त्याने अनुक्रमे 2315, 6793 आणि 1759 धावा केल्या. कसोटीत त्याने 7 शतक आणि 5 अर्धशतक ठोकले आहेत. 190 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर वन डे मध्ये त्याने 143 या सर्वोच्च धावसंख्येसह 17 शतक आणि 39 अर्धशतक केले आहेत. टी20मध्ये त्याने 11 अर्धशतकीय खेळी साकारल्या आहेत. आयपीएलच्या 22 लढतीत त्याच्या नावावर 6769 धावांची नोंद असून यात त्याच्या 2 शतकांचा आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे.