शिंदे नरमले, एकच गट नोंदणी करण्यास राजी; मिंधे गटही भाजपच्या वळचणीला

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर पालिकेतील सत्तेच्या वाटपावरून शिंदे गटाने आडेवेढे घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाबाबत तडजोड न करण्याची घेतली भूमिका यामुळे अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमते घेत भाजपच्या वळचणीला जाऊन बसणे मान्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाची एकत्र नोंदणी करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी सत्तेच्या वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती. गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधील डिनर डिप्लोमसीनंतर मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटाने एकत्रपणे सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुंबइचे महापौरपद आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची वर्णी लावायची यावर दोघांमध्ये अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन-तीन दिवसांत गटनोंदणी

भाजप आणि शिंदेंच्या नगरसेवकांची येत्या दोन ते तीन दिवसांत एकत्रित गटाची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्र कोकण भवनमध्ये जाणार असल्याचीही माहिती आहे.

आयुक्त गगराणी पीठासन अधिकारी

मुंबई महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन महापौराची निवड करताना ते कामकाज पीठासीन अधिकाऱयांच्या उपस्थितीत होणं अपेक्षित आहे.

शिंदे गटाला कार्यालय नाही

भाजप आणि शिंदे गटाची पालिकेत एकच गट म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे पालिका नियमानुसार शिंदे गटाला कार्यालयासाठी वेगळी जागा मिळणार नाही. त्यांना भाजप कार्यालयातच आपले कार्यालय थाटावे लागणार आहे.

गटनेतेपद भाजपकडे, तर शिंदे गटाला प्रतोदपद

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची एकच गट म्हणून नोंदणी केल्यास स्थायी समितीसह अन्य समित्यांमध्ये एक-दोन सदस्य वाढण्याची शक्यता आहे. गटनेतेपद भाजपकडे आणि शिंदे गटाला प्रतोदपद देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापौरपदासाठी ही नावे चर्चेत

मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले आहे. भाजपकडून यासाठी राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. यापैकी एका नावाची महापौर म्हणून निवड होणार, की भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाला सोबत घेण्याच्या हालचाली

मुंबई महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाला महायुतीने सोबत घेतले नव्हते. मात्र, पालिकेत सत्तास्थापन करताना संख्याबळानुसार विविध समित्या आणि त्यावरील सदस्यांची नियुक्ती यासाठी करावी लागणारी तडजोड लक्षात घेता अजित पवार गटाच्या तीन नगरसेवकांना सोबत घेण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत.