‘फोन पे करा, गुगल पे करा… काहीही करा, पण बाहेरगावी राहणार्या मतदारांना मतदानासाठी आणा!’ असे रोख आमिष दाखवणारे गद्दार आमदार संतोष बांगर यांना निवडणूक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. ‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, असे पत्रच निवडणूक विभागाने आमदार बांगर यांना दिले आहे.
कळमनुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार संतोष बांगर यांनी बाहेरगावी राहणार्या मतदारांना ‘फोन पे करा, गुगल पे करा… काय लागते ते सांगा, गाड्या लावा, काहीही करा, पण मतदानासाठी आणा… असे रोख आमिष दाखवले. बाहेरगावी राहणार्या मतदारांच्या याद्या दोन दिवसांत देण्याचे फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले होते. शिवसेनेचे विभागीय नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून निवडणूक आयोग या रोख आमिषावर कारवाई करणार का? असा सवाल केला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील आणि अजित मगर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे रीतसर तक्रार करून आमदार बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
‘फोन पे करा, गुगल पे करा’ पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलवा; गद्दार आमदार संतोष बांगर यांचे रोख आमिष#viralvideo pic.twitter.com/1174MiC71P
— Saamana (@SaamanaOnline) October 19, 2024
शिवसेना पदाधिकार्यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ दखल घेतली. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना आमदार बांगर यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांनी आमदार बांगर यांना ‘फोन पे, गुगल पे’ चा २४ तासांत खुलासा करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
चोराच्या उलट्या बोंबा!
व्हिडीओतील आवाज माझा नाही, मला फोन पे, गुगल पे काय आहे हे माहिती नाही अशी उलटी बोंब गद्दार आमदार संतोष बांगर यांनी ठोकली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी खुलासा करण्याचे पत्र दिल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना बांगर यांनी हा कांगावा केला. व्हिडीओ माझा असला तरी तो आवाज माझा नाही असेही ते म्हणाले.