मिंधे सरकारमागे गुजरातमधून चालणाऱ्या ‘अंडरवर्ल्ड’ची ताकद; संजय राऊत यांचा घणाघात

माजी मंत्री, अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या हत्याकांडावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मिंधे सरकार आल्यावर मुंबईत अंडरवर्ल्डची ताकद वाढू शकते हे आपण आधीच सांगितले आहे. कारण या सरकारमागेही गुजरातमधून चालणाऱ्या ‘अंडरवर्ल्ड’ची ताकद असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गुजरातमध्ये आजही 5 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले आहे. याचाच अर्थ 50 हजार कोटींचे ड्रग्ज सूटले असून संपूर्ण देशात पसरले आहे. हा पैसा कुणाकडे, कोणत्या पक्षाकडे जातो? या पैशातून कोण निवडणूक लढते हे सांगण्याची गरज नाही.

राज्याच्या मंत्रीमंडळात एक फूल आणि दोन हाफ ‘सिंघम’ असताना अशी हत्या होते आणि मुंबईतील या हत्येची जबाबदारी गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला गँगस्टर घेतो, ही गंभीर बाब आहे. मुंबईतील गुन्हेगारीचे सूत्रसंचालनक गुजरातमधून होतंय याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईतील उद्योग पळवायचे, पैसा पळवायचा, आमच्या माणसांना त्रास, हत्या करायच्या या सगळ्याचे सूत्रसंचालन गुजरातमधून होतंय. खरे म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागावा असे हे प्रकरण असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खोकेबाजी, बोलबच्चनगिरी कमी करून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

पब्लिसीटीसाठी शिंदेला गोळ्या घातल्या

काही दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला गोळ्या घालण्यात आल्या, कारण मिंधे सरकारला पब्लिसीटी हवी होती. आता बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांना गोळ्या घाला. मुख्यमंत्री मोठ्या तोऱ्यात म्हणाले होते की ‘बिष्णोई गँगचे मुंबईमध्ये काही चालणार नाही, मी बघून घेईल’, आता बघून घ्या, असेही राऊत यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मौनावरही भाष्य केले.

शिंदे-फडणवीस राजकारणासाठी गुंडांचा वापर करताहेत

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली, राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आणि त्याच मंत्रीमंडळात अजित पवार बसतात. त्याच मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. काय करताहेत हे? सामान्य लोकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटत आहे. मुंबई, पुण्यात कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याने हल्ले होतील याचा भरवसा नाही. शिंदे-फडणवीस राजकारणासाठी गुंडांचा वापर करत आहेत. शिदेंनी पोलीस खात्यात आणि बाहेरही गुंडांच्या टोळ्या पोसल्या. लोकसभेत त्यांचा वापर झाला आणि विधानसभेतही होईल, असेही राऊत म्हणाले.

शिदेंचे सरकार आणि फडणवीसांसारखा गृहमंत्री महाराष्ट्राला कलंक

दरम्यान, आजही मंत्रीमंडळाची बैठक झाली असून यावरही राऊत यांनी भाष्य केले. रोज मंत्रीमंडळाच्या बैठका घेताहेत आणि 100-100 निर्णय घेत आहेत. राज्याची टिंगल, टवाळी सुरू आहे. गेल्या आठवड्यात 1200हून अधिक निर्णय घेण्यात आले. आज सायंकाळपर्यंत आणखी 10 हजार निर्णय घेतील. इतके बकवास आणि खोटारडे सरकार गेल्या 10 हजार वर्षात झाले नाही. शिदेंचे सरकार आणि फडणवीसांसारखा गृहमंत्री महाराष्ट्राला कलंक आहे, अशी टीका राऊत यांनी केली.