
कर्जतच्या पंचायत समिती कार्यालयातील शासकीय कार्यक्रमात चक्क मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांच्या खुर्चीवर बसून त्यांच्या पुतण्यानेच अधिकाऱ्यांना फर्मान सोडल्याचे समोर आले आहे. या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड उठली असून हा नवीन आमदार कोण, असा सवाल कर्जतकरांनी केला आहे. यावर अजित पवार गटानेही आक्षेप घेत दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांची कार्यशाळा कर्जत पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. तालुकास्तरीय या कार्यशाळेला आमदार महेंद्र थोरवे अनुपस्थित राहिले. मात्र त्यांच्या ऐवजी त्या-‘चा पुतण्या प्रसाद थोरवे हे चक्क शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार या कार्यशाळेत अधिकाऱ्यांना शासनाच्या अभियानाची माहिती देणे आणि प्रशिक्षण देणे हा उद्देश होता. मात्र कोणत्याही अधिकाराशिवाय पुतण्याला बोल ण्याची संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रशासन इतके ‘मिंधे’ का?
सत्ता आणि पैशांच्या जोरावर सत्ताधारी मनमानी कारभार करत असल्याची टीका अनेकदा होते. कर्जतमध्येही आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुतण्याचा स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आल्याने सर्वच स्तरांतून टीका होत आहे. कोणतेही अधिकार नसताना मिंधे गटाचा एक पदाधिकारी शासकीय अभियानाची माहिती कुणाच्या आशीर्वादाने देतो. प्रशासन इतके ‘मिंधे’ का झाले आहे, अशी टीका नागरिकांनी केली आहे.
तातडीने कारवाई करा !
महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाच्या तालुका महिला अध्यक्षा अॅड. रंजना धुळे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या शासकीय कार्यक्रमात पुतण्याला बोलण्याची संधी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी व्हायला हवी. अन्यथा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर संगनमताचा संशय निर्माण होईल अशी टीका त्यांनी केली.