शिर्डी, राहाता परिसरात गुन्हेगारीचे साम्राज्य; पोलीस निश्क्रिय, आरोपींना राजकीय संरक्षण?

crime news new

राहाता, शिर्डी परिसर सध्या घाबरवणाऱया गुन्हेगारीने वेढला आहे. खून, दरोडे, अपहरण, हप्तेखोरी, अवैध व्याजधंदे, बिंगो–गुटखा उद्योग आणि वाहनचोरी असे अपराध पोलीस ठाण्यांच्या आजूबाजूला उघडपणे सुरू असूनही पोलिसांकडून कारवाई शून्य आहे. गुन्हेगार निर्धास्त असून, सामान्य जनता भयभीत आहे. या परिसरात कायद्याची भीती संपली आहे. गुन्हेगार स्वतः कायदा ठरवू लागले आहेत. राहाता–शिर्डी परिसरात नुकताच घडलेला सचिन गिधे यांचा निर्घृण खून या निक्रियतेचे, राजकीय संरक्षणाचे आणि गुन्हेगारी संगनमताचे रक्तरंजित प्रतीक ठरले आहे. हा खून केवळ एका व्यक्तीचा अंत नसून, प्रशासनाच्या अपयशाचा आणि सामाजिक असुरक्षिततेचा ठसा आहे. यामुळे शिर्डी–राहाता परिसरातील जनतेत भय आणि संताप उसळला आहे.

सचिन गिधे हे गरीब कुटुंबातील व्यक्ती होता. संभाजीनगर तालुक्यातील कन्नड या परिसरामध्ये त्याचे वास्तव्य आहे. कामासाठी सचिन शिर्डीला आला होता. त्यावेळी त्याची आणि दीपक पोकळे याची ओळख झाली होती. सचिनच्या भावाने त्याच्या खात्यावर काही पैसे पाठवले होते. ते पैसे मला दे, असं म्हणून पोकळे याने त्याला धमकावले आणि त्याचा खून केला, असे तपासामधून उघड झाले आहे.

सचिन गिधे यांचे 10 डिसेंबर 2025 रोजी अपहरण झाले. याबाबत त्याची पत्नी श्रद्धा गिधे यांनी 15 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याचप्रकरणी प्रवीण ऊर्फ पचास वाघमारे व दीपक पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक 15 दिवस पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आदी भागांत तपास करत होते. 6 जानेवारी रोजी मेंढवण (ता. संगमनेर) येथे दीपक पोकळे व गणेश दरेकर यांना अटक केली. चौकशीत दीपक पोकळे याने प्रवीण वाघमारे, गणेश दरेकर व कृष्णा वाघमारे यांच्या साथीने सचिन गिधे याचा खून केल्याचे कबूल केले. खून केल्यानंतर मृतदेह जाळल्याची कबुलीही त्यांनी दिली. पोलीसांनी आरोपींकडून 15.72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये विनानंबर स्कॉर्पिओ गाडी आणि तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

राहाता, शिर्डी परिसरातील नागरिक आता भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. बिंगो, गुटखा, अवैध व्याजधंदे, हप्तेखोरी, वाहनलुटी असे गुन्हे पोलीस ठाण्यांच्या आजूबाजूला उघडपणे सुरू आहेत. गुन्हेगार निर्धास्त आहेत आणि सामान्य माणूस भयभीत आहे. हे पोलीस लक्षात घेत नाहीत का, किंवा दिसूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिर्डी मतदारसंघातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे दीपक पोकळे याचे धाडस वाढले, असा आरोप नागरिक करीत आहेत. राजकीय संरक्षणाशिवाय, फिर्यादींना धमकावणे, तक्रारी मागे घेण्यास भाग पाडणे, जामिनावर सुटणे हे शक्यच नाही. ही परिस्थिती फक्त पोलीस अपयशाचे नाही, संपूर्ण संगनमताचे भयानक वास्तव आहे.

दीपक पोकळे हा अपहरण, हप्तेखोरी, बिंगो–गुटखा व्यवसाय, वाहनचोरी, दरोडे या सर्व गुह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. 10 डिसेंबर रोजी शिर्डी येथून सचिन गिधे यांचे अपहरण करून, त्यांचा खून करत मृतदेह टायर व डिझेलने जाळून पुरावे नष्ट करणे, या घटनेतून आरोपींच्या गुन्हेगारी पॅटर्नची भीषणता लक्षात येत आहे. ही गुन्हेगारी केवळ वैयक्तिक द्वेष नसून, पोलीस निक्रियता आणि राजकीय संरक्षण यांचा भयानक परिणाम आहे.

संगमनेरातील शेतकऱ्यावर सशस्त्र  हल्ला

संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर यांच्यावर 12 सप्टेंबरला सशस्त्र हल्ला करून दीपक पोकळे फरार झाला आहे. या घटनेनंतर आठ-दहा दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या निक्रियतेविरोधात मिरपूर, लोहारे व परिसरातील शेतकऱयांनी रविवारी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला होता. दोन दिवसांत आरोपीला अटक न झाल्यास संगमनेर शहरात रास्ता-रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

दीपक पोकळे गुन्हेगारीचे केंद्रबिंदू; 20 गुन्हे दाखल

दीपक पोकळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनी हल्ले, दरोडे, खंडणी, अपहरण आदी गंभीर गुह्यांची नोंद आहे. एका अपहरण प्रकरणात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून, तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून त्याचा जामीन रद्द करून तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. ज्यावेळी पोकळेला पोलिसांनी अटक केली, त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर 18 ते 20 विविध कलमांचे भयंकर गुन्हे दाखल असल्याची यादीच दिली होती.

या परिसरातील भीषण गुन्हेगारीचे केंद्रबिंदू म्हणजे दीपक अंबादास पोकळे. तब्बल 17 गंभीर गुह्यांचा आरोपी, मकोका असूनही पंधरा वर्षे मोकाट फिरतोय. हत्यांपासून दरोडय़ांपर्यंत, अवैध व्याजधंद्यांपासून बिंगो–गुटखा व्यवसायापर्यंत, तो गुन्हेगारीचे सर्व प्रकार उघडपणे करत आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी संगमनेर तालुक्यात अनिल आहेर यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला, 10 डिसेंबर रोजी सचिन गिधे यांचे अपहरण व निर्घृण हत्या या घटनांमुळे दीपक पोकळे समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले, तरीही पोलीस यंत्रणा डोळे झाकून बसली होती. चार महिने आरोपी मोकाट राहतो, कोणतीही नजरकैद नाही, कोणतीही तडीपारी नाही, हे जाणीवपूर्वक घडवलेले वास्तव आहे. खून केल्यानंतर मृतदेह टायर व डिझेलने जाळून पुरावे नष्ट करणे हे आरोपींच्या धाडसाचे, पोलीस निक्रियतेचे आणि संभाव्य राजकीय हस्तक्षेपाचे भयानक उदाहरण आहे. हे अपराध फक्त व्यक्तिगत द्वेषाचे परिणाम नाहीत; तर हे गुन्हेगारी, निक्रिय पोलीस आणि राजकीय संरक्षण यांचा भयंकर संगम आहे. याला शिर्डीतील कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, हा खरा प्रश्न आहे. सचिन गिधे यांचा खून फक्त गुन्हेगारीचे फळ नाही, तर संपूर्ण पोलीस–राजकीय यंत्रणेच्या अपयशाचे भयानक उदाहरण आहे.