शिव नाडर देशातील सर्वात मोठे दानशूर! दररोज देताहेत 7.4 कोटींचे दान

एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. वर्षभर त्यांनी दररोज किमान 7.4 कोटी रुपयांचे दान दिले आहे. वर्षभरात हिंदुस्थानातील 191 श्रीमंत व्यक्तींनी एकूण 10 हजार 380 कोटी रुपयांचे दान दिले आहे, अशी माहिती एडेलगिव्ह-हुरुण इंडिया फिलँथ्रॉपी इंडेक्स 2025 मधून समोर आली आहे. पहिल्या स्थानावर शिव नाडर, तर दुसऱ्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी असून तिसऱ्या स्थानावर बजाज ग्रुप आहे.

सर्वोच्च देणगीदारांच्या यादीत 24 महिलांचाही समावेश आहे. ज्यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांनी एकूण 204 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या यादीत त्या अव्वल स्थानी आहेत, तर दुसऱ्या स्थानावर बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार शॉ आहेत. त्यांनी 83 कोटी रुपयांची देणगी दिलीय. वैयक्तिक देणग्यांच्या यादीत नाडर आणि त्यांचे कुटुंब अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 2 हजार 537 कोटी रुपयांची देणगी दिलीय. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 3.56 अब्ज आणि 1.99 अब्ज देणगी दिलीय. झिरोधाचे निखिल कामथ आणि नितीन कामथ हे सर्वात तरुण दानशूर व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 147 कोटी देणगी दिली. बिन्नी बन्सल दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी 18 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

मागील वर्षी 2 हजार 153 कोटींचे दान

शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 2023-24 आर्थिक वर्षात 2,153 कोटी रुपयांचे दान केले, जे दररोज 5.90 कोटी रुपये होते. 79 वर्षीय शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि शिव नाडर फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते जगातील 52 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 34.4 अब्ज म्हणजेच 2.99 लाख कोटी आहे.