राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले; खासदारकी रद्द करा! विनायक राऊत यांची निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे भ्रष्ट मार्गांचा वापर करीत निवडून आले. त्यांनी मतदारांना पैसे वाटले, धमकी दिली. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून राणे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राणेंची खासदारकी गोत्यात आली आहे.

विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. भ्रष्ट मार्गांचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्याबरोबरच त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास तसेच मतदान करण्यास बंदी घालावी. नारायण राणेंसह त्यांचा पुत्र नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे. लोकशाहीची घोर फसवणूक करून नारायण राणे निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची तसेच त्यांनी अवलंबलेल्या भ्रष्ट मार्गांची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी कायदेशीर नोटीसमधून केलेली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजीही व्यक्त केली आहे. राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरप्रकारांविरुद्ध 16 मे रोजी तक्रार केली होती, मात्र त्याची दखल आयोगाने घेतली नाही ही दुर्दैवी बाब असल्याचा सडेतोड दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

मतदारांना पैसे वाटप आणि धमकी

n निवडणूक प्रचार 5 मे रोजी संपला. मात्र भाजप कार्यकर्ते 6 मे रोजीसुद्धा प्रचार करीत होते. हे कार्यकर्ते मतदारांना ईव्हीएम दाखवून ‘राणे साहेबांनाच मत द्या’ असे सांगत पैसे वाटप करीत होते. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.
n नितेश राणे यांनी मतदारांना धमकावले. ‘जर राणेसाहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही, अशी धमकीची भाषा नितेश राणे यांनी 13 एप्रिलच्या जाहीर सभेत केल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

हायकोर्टात याचिका दाखल करणार

निवडणूक प्रचारावेळी नारायण राणे यांनी केलेल्या गैरप्रकारांबाबत आम्ही तक्रार केली होती. त्यावर निवडणूक आयोग कारवाईबाबत ढिम्म का राहिला? याबाबत निवडणूक आयोगाने सात दिवसांत उत्तर द्यावे, अन्यथा उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

निवडणूक अधिकाऱयांच्या मदतीने भाजपचा भ्रष्टाचार

अनेक ठिकाणी पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व त्याकडे दुर्लक्ष करून कारवाई टाळणे हे सर्व प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या मदतीने घडलेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. देशावर प्रेम करणाऱया प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी ही परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. असीम सरोदे यांनी दिली.