
महायुतीकडे ईव्हीएमने मिळवलेले संख्याबळ आहे, पण शिवसेनेकडे प्रामाणिकपणे झुंज देऊन विजयी झालेले 20 आमदार आहेत. यातला एकेक आमदारही सभागृह डोक्यावर घेऊ शकतो. फक्त एकजुटीने राहा. तीच आपली ताकद आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या आमदारांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यात नवे चैतन्य निर्माण झाले. जनतेच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असा निर्धार आज त्यांनी केला.
विधिमंडळातील पुस्तके वाचा, नियम समजून घ्या
विधिमंडळात मिळणारी पुस्तके प्रत्येक आमदाराने वाचावीत आणि सभागृहातील नियमावली समजून घ्यावी असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
विधिमंडळातील कामकाजाबाबत आज शिवसेनेच्या आमदारांना तज्ञ तसेच अनुभवी आमदारांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सभागृहातील कामकाजातील बारीकसारीक गोष्टींबाबत त्यांना अवगत करण्यात आले. सांसदीय आयुधांचा वापर कसा करायचा हे सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यासाठी आज शिवसेनेने या मार्गदर्शनाद्वारे आमदारांना तयार केले.
या शिबिराची सांगता उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने झाली. मराठी भाषा म्हणजे एक शस्त्र आहे आणि ते आपल्याला फक्त वापरता आले पाहिजे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आमदार अनिल परब यांनी लक्षवेधीविषयी आमदारांना महत्त्वाच्या टीप्स दिल्या त्याचेही कौतुक यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. गेले पाच वर्षे आपण अनुभवले की सभागृहात केलेले एखादे वक्तव्य अंगलट येते. मी सभागृहात असायचो तेव्हा वर अनिल परब यांना विचारायचो आणि खाली सुनील प्रभू यांना विचारायचो, असा अनुभव सांगताना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊनच पुढे जा असे संकेत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले.
पुढे फडणवीस असले तरी आपले 20 जण त्यांना पुरेसे आहेत हे आपण अनेकदा बोललो आहोत. कारण यापूर्वी शिवसेनेचे अनेक आमदार एकटे होते, पण तरीही त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले होते, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख केला. आपल्याकडे भुजबळ होते तेव्हा ते एकटे सभागृह डोक्यावर घ्यायचे. संधी मिळाली की सोनं करता येते. एक जरी असला तरी सभागृह डोक्यावर घेता येते असे उद्धव ठाकरे म्हणाले.