केईएमने कोविडबाबत उपाययोजना तातडीने कराव्यात! शिवसेना शिष्टमंडळाची रुग्णालय प्रशासनाकडे मागणी 

मुंबईतील कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि केईएममध्ये दोन कोविड रुग्णांचा झालेला मृत्यू ही गंभीर घटना पाहता केईएम रुग्णालय प्रशासनाने कोविडला आळा घालण्यासाठी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केईएम रुग्णालय प्रशासनाकडे केली.

मुंबईतील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केईएम रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही गेल्या काही महिन्यांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहेत. केईएम रुग्णालयामध्ये 10 रुग्ण कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले. त्या रुग्णांना केईएमने महापालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचाराकरिता स्थलांतरित केले आहे. केईएम रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने लोकांमध्ये जागरुकता करावी तसेच मार्गदर्शक सूचना द्याव्यात, रुग्णालयामध्ये आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, जयसिंह भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.