
राज्यातील गोरगरीबांना आर्थिक अडचणींमुळे महागडे शिक्षण घेणे परवडत नसल्याने केरळ सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी केली आहे. याबाबत पालिकेच्या महासभेत त्यांनी ठरावाची सूचना मांडून पालिकेने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
केरळ सरकारने पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा 2026-27 च्या अर्थसंकल्पात केली आहे. ज्यामुळे केवळ गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण समाज आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रगतीची समान संधी मिळून, त्यायोगे उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन व नवीन उपक्रम वाढतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. ‘मानव विकास’ खऱ्या अर्थाने साधला जाईल. यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही मीनाक्षी पाटणकर यांनी केली आहे.

























































