पुण्यापाठोपाठ ठाणेही नशेड्यांचे शहर बनू लागले असून सत्ताधारी आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात अमली पदार्थांच्या विक्रीचे अड्डे वाढले आहेत. एमडी, गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांच्या गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढले असून सर्वसामान्य ठाणेकरांना जगणे मुश्कील झाले आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील अमली पदार्थांच्या अड्ड्यांची यादीच पोलिसांना दिली असून एमडी, गांजाचे अड्डे तत्काळ उद्ध्वस्त करा अशी मागणी केली आहे.
घोडबंदर येथील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानपाडा, आझादनगर आणि मनोरमानगर परिसरात गर्दुल्ल्यांची दहशत वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी आझादनगर येथील दुकानदार विष्णू कवठीकवार यांनी उधारीवर सामान न दिल्यामुळे गर्दुल्ल्यांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत निष्पाप कवठीकवार यांना जीव गमवावा लागला.
त्याचबरोबर गर्दुल्ल्यांकडून दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून घरातील मौल्यवान वस्तूची चोरी करणे, रस्त्यात जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांची व मुलींची छेड काढणे असे प्रकार घडत असून या गर्दुल्ले, गुंडांना राजकीय पाठिंबा आहे का, असा संशय व्यक्त केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, राजन विचारे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांची भेट गर्दुल्ल्यांचा आणि त्यांच्या गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
दलालांचा शोध घ्या!
गर्दुल्ल्यांच्या भीतीमुळे सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार करत नाही. अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये यासाठी पोलिसांनी वेळीच पावले उचलावीत. तसेच या प्रभागात पोलिसांनी गस्त घालावी. गर्दुल्ल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून अमली पदार्थ पुरवत असलेल्यांचा शोध घेऊन सर्वांना जेरबंद करावे अशी मागणी राजन विचारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्याकडे केली आहे. त्यावर पोळ यांनी अशा गुन्हेगारांची जराही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही विचारे यांना दिली.
हे आहेत हॉटस्पॉट
- मिथिला दुर्गा देवी मंदिर मागील परिसर आझादनगर.
- आझादनगर बसस्टॉपजवळील सार्वजनिक शौचालयामागील बाजूस.
- डी. एड. कॉलेजजवळील मोकळा परिसर (खेती) मनोरमानगर.
- मनोरमानगर बुद्ध विहारजवळील मोकळा परिसर (लोढा कंपाऊंड)
- शनी मंदिर बाजूचा परिसर मनोरमानगर.
- मानपाडा नेप्रो कंपनीचे मैदान.
- मानपाडा पाण्याच्या टाकीच्या बाजूचे मैदान.
- नवबाल विद्या मंदिर मागील बाजूस सार्वजनिक शौचालयावर.