राज्यातील महायुती सरकार गद्दारी आणि विश्वासघात करून सत्तेत आले आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे चरणस्पर्श करून शपथ घेतली होती की मराठ्यांना कोर्टात टिकणारे आरक्षण देणार. त्याचे काय झाले, असा सवाल करताना भगिनींना चांगलेच माहीत आहे की आपला भाऊ पक्का लबाड आहे, म्हणूनच त्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर लगेच पैसे काढत असल्याचा टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लगावला.
भास्कर जाधव यांनी शीवतीर्थावर सरकारच्या फसवेगिरीचा फर्दाफाशच केला. मनोज जरांगे यांनी सरकारचा डाव ओळखल्याने उपोषण सोडल्याचे ते म्हणाले. सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचे सांगत होते. मात्र मागील आठवड्यात ओबीसींमध्ये आठ ते दहा जातींचा उपवर्गीय म्हणून समावेश करून जाती-जातींमध्ये भांडणे लावल्याचा प्रयत्न केल्याचेही जाधव म्हणाले. राज्याच्या सत्ताधारी पक्षातील आमदार, आदिवासी आमदारांना आपल्या हक्कांसाठी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण आता त्यांचाही आपल्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही.
2014 मध्ये 15 लाख रुपये देणार होते. आता दहा वर्षांनी पंधराशे रुपये देताहेत. चारशेचा सिलिंडर बाराशेवर गेला. पंतप्रधानांनी सांगितले भाऊबीज देऊ. काय दिलं? 200 रुपये, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.