आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून हजारो कोटींच्या घोषणांची खैरात केली जात आहे. प्रत्यक्षात कोणतीही कामे, विकास दिसत नसल्याने हे हजारो कोटी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. ‘लाडक्या बहिणी’च्या बाबतीतही असाच प्रकार सुरू आहे. आपल्या बहिणीला दिलेल्या मदतीची कुणी जाहिरात करतो का? असा सवाल करीत सरकारकडून फक्त पंधराशे रुपये दिले जात असताना बॅनरबाजीमुळे ‘लाडक्या बहिणी’च्या गरिबीची थट्टा सुरू असल्याचा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारच्या फसव्या योजना आणि गैरकारभाराची पोलखोल केली. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शिंदे पिंवा फडणवीस आपली स्वतःची जमीन विकून पैसे देत नसून ते जनता भरत असलेल्या करातील आपल्या हक्काचे पैसे असल्याचे त्या म्हणाल्या. गद्दारीने स्थापन झालेले सरकार पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजात, जातींमध्ये भांडणे लावत आहे. एमपीएससीच्या 76 पैकी 65 परीक्षांमध्ये पेपरफुटी झाली. याबाबत प्रश्न विचारले असता, राजकारण करू नका, असे सरकार बोलत असल्याचे त्या म्हणाल्या. महापुरुषांच्या नावांतून राजकारण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारच खोटे नरेटिव्ह पसरवते
राजकीय आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून झाले असताना भाजपकडून खोटे नरेटिव्ह पसरवले जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाल्या. लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देता, पण तिच्या सुरक्षेचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गेल्या सात महिन्यांत 262 बलात्कार, 750 विनयभंग झाले असल्यामुळे सरकारची जरब आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.