शिवसेनेच्या वाघाने ‘सुरत’चा मुद्दा उपस्थित करताच विधानसभेत शिंदे गटाचा थयथयाट, एकट्या नितीन देशमुखांना रोखायला आठ-आठ आमदार सरसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सुरतचा विषय काढताच शिंदे गटाच्या आमदारांचा थयथयाट झाला. देशमुख यांना बोलण्यापासून थांबवा अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी सुरतेमध्ये जे घडले त्याबाबत दिलेली माहिती पटलावरून काढून टाका अशी मागणी केली.

नितीन देशमुख यांनी अकोल्यातील आपल्या बाळापूर मतदारसंघातील कामांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच साताऱयाच्या घटनेवरून सभागृहात केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. देशमुख म्हणाले की, ‘शंभूराज देसाईंचे भाषण मी पाहिले. साताऱयाला पोलिसांनी अन्याय केला. एका आरोपीसारखी स्थिती शंभूराजेंची झाली. बरं झालं, महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्रिमहोदय ‘नशे मे धूत थे’ असे म्हटले नाही. सुरतला त्यावेळी गुजरातच्या पोलिसांनी ‘महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे मे धूत थे. इसलिये हम उठा के ले गये’ असे म्हटले होते. त्यावेळी पहाटे साडेतीन वाजता शंभर पोलीस माझ्या मागे लागले होते. एखादी डेड बॉडी उचलतात तसे उचलले आणि रुग्णालयात नेऊन जबदस्तीने इंजेक्शन टोचले. नंतर सांगितले, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया.’’

नितीन देशमुख यांनी सुरतची ही वस्तुस्थिती सांगताच सत्ताधारी बाकांवरील शिंदे गटाच्या आमदारांनी जागेवरून उठून गोंधळ घातला. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आठ-आठ आमदार देशमुख यांना रोखण्यासाठी ‘हे सर्व खोटं आहे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडले. मात्र आपण खोटं बोलत नसून वस्तुस्थिती मांडली असे देशमुख म्हणाले. त्यावेळी टीव्हीवरही आपल्याला झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या कुणी दिल्या होत्या, असा सवाल देशमुख यांनी केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या साडेतीन वर्षांत एक रुपयाचा निधी आम्हाला मिळाला नाही. आमच्या मतदारसंघातील लोक टॅक्स भरत नाहीत का? बांधकाम विभागावर आज शिवेंद्रराजे आहेत. राजांनी कधी अन्याय करू नये, असेही देशमुख म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांना साडेतीन वर्षांपूर्वी सुरतला पळवून नेले. जे त्यांच्यासोबत गेले नाहीत त्या आमदारांच्या कामांना निधी दिला नाही, असेही आमदार देशमुख म्हणाले. सर्व गोंधळानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देशमुख यांना 30 सेकंद बोलण्याची संधी दिली; मात्र 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही अशी ठाम भूमिका देशमुख यांनी घेतल्याने त्यांना पुढे बोलता आले.