उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, वरुण सरदेसाई यांनी सुरक्षा रक्षकांच्या धक्काबुक्कीवरून गोऱ्हेंना सुनावले

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांना विधान भवन आवारात धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. नीलम गोऱहे यांच्यासमोर हा प्रकार घडला. दुसऱ्यांदा असे घडल्याने वरुण सरदेसाई चांगलेच संतापले होते.

आमदार आहोत हे ओळखू यावे म्हणून आम्ही बिल्ले लावतो. त्यानंतरही उपसभापतींचे सुरक्षा रक्षक धक्के मारून जातात. उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळे विमान विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा, असे सरदेसाई यांनी सुनावले.

धक्काबुक्कीचा हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. पहिल्यावेळी मी काही बोललो नाही. गेल्या वेळी पायऱ्यांवर उभा असताना सुरक्षारक्षकाने बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. यांच्यासोबत कुणीही येतात आणि आमदारांना धक्के देतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे वरुण सरदेसाई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. आमचे बिल्ले पाहून तरी आमदारांना जायला जागा द्या, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.