
बांधकामे थांबवल्यामुळे मुंबईतील वातावरण मध्यंतरी सुंदर झाले होते. पण तीन दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. वारंवार इमारतींची बांधकामे थांबवणे ही उपाययोजना होऊ शकत नाही. यावर ठोस धोरणाची गरज असल्याची मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी केली. दरम्यान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बांधकाम प्रकल्पांनी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी सादर करा असे निर्देश आज दिले.
मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन संयंत्रे बसवण्याबाबत सदस्य मनिषा चौधरी यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी अजय चौधरी म्हणाले, माझ्या विभागात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे करताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही, प्रदूषण थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नाहीत एफ दक्षिण विभागातील बांधकाम प्रकल्पांमध्ये उपाययोजनांची अमलबजावणी कधी केली जाईल? प्रदूषण करणाऱ्या बांधकामांना थांबवणार का असा प्रश्न केला.
बुलेट ट्रेन प्रकल्पातून प्रदूषण – वरुण सरदेसाई
वांद्रे भागात बुलेट ट्रेन प्रकल्पाला प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून दोनवेळा काम थांबवण्याचे आदेश दिले नंतर पुन्हा काम सुरु करण्यास परवानगी दिली. पण प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या याची माहिती देत नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून अशा मोठय़ा प्रकल्पाच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाहीत. महापालिकेच्या अधिकाऱ्याला तर आतमध्येही घेत नाहीत. वांद्रे पूर्व सरकारी वसाहतीच्या 25 इमारती पाडल्या आहेत. त्याचे ढिगारे तिथेच पडले आहेत. मातीचे हे ढिगारे कधी उचलणार? कारवाईसाठी ज्या ठिकाणी कोणतेही सक्रीया प्राधिकरण नाही पण त्यासाठी प्रदूषण होत आहे त्यावर महापालिका काय कारवाई करणार असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.





























































