विकासाची ब्ल्यू प्रिंट! ट्रॅफिकमुक्त, टँकरमुक्त, आरोग्यदायी आणि सुरक्षित ठाणे; शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणेकरांच्या भविष्याचा विचार करून पर्यावरणपूरक, नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासाचा वचननामा आज शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने सादर केला. या वचननाम्याचे प्रकाशन शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते राजन विचारे, मनसे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील 25 वर्षे डोळय़ांसमोर ठेवून ठाणे घडवण्याचे वचन देतानाच टॅफिकमुक्त, टँकरमुक्त, आरोग्यदायी आणि सुरक्षित ठाण्याचा संकल्प या वचननाम्यातून केला आहे.

मजबूत रस्त्यांचे जाळे, आरोग्य सेवांची बळकटी, महापालिकेच्या शाळांतून डिजिटल शिक्षण, उच्च शिक्षणाच्या व्यवस्थांसह काwशल्य विकास पेंद्रांची निर्मिती, उद्योजकांसाठी इन्क्युबेशन सेंटर्स अशी विकासाची ब्ल्यू प्रिंटच या वचननाम्यातून सादर करण्यात आली.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने उतरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ठाण्यातील रस्त्यांची ठेकेदारांनी लावलेली वाट, पर्यायाने तासन्तास टॅफिकमध्ये अडकलेले ठाणेकर, ठाणेकरांचे हक्काचे बिल्डरांकडे वळवलेले पाणी त्यामुळे सुरू झालेले टँकर राज, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, खासगी शाळांच्या अवाचेसवा फीमुळे मोडलेले सर्वसामान्य पालकांचे पंबरडे यामुळे मेटाकुटीला आलेल्या ठाणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा रोडमॅपच बनवला आहे. शिवशक्तीचा हा वचननामा ठाणेकरांना विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा ठरणार आहे. यावेळी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, उपनेते गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, कल्याण जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बजेटमध्ये तरतूद असताना देखील आनंद दिघेंचे स्मारक नाही – राजन विचारे

मुंबईपाठोपाठ उत्तम नियोजन असणारी ठाणे महापालिका होती. मात्र गेल्या 3 वर्षात शिंदे गटाने पालिकेची वाट लावली. तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य सरकारकडून आलेल्या निधीचीदेखील लयलूट शिंदे गटाने केली. शहराचे नियोजन बिघडले आहे. पाणी, ट्रफिक, कचऱ्यासारखे प्रश्न आव वासून उभे आहेत. बजेटमध्ये तरतूद असताना देखील शिंदे गटाने धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक केलेले नाही ही लाजिरवाणी बाब आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावायचे, मात्र त्यांचा आदर्श ठेवायचा नाही हे ठाणेकर खपवून घेणार नाहीत, असा इशारा शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी दिला.

पुढच्या 25 वर्षांच्या विकासाचे वचन अभिजित पानसे

थोडक्यात पण महत्त्वाचा वचननामा आम्ही ठाणेकरांसमोर ठेवला आहे. रस्ते, मेट्रो, क्लस्टरपुरते मर्यादित न राहता शहर घडवण्याची कशी गरज आहे हे पुढची 25 वर्षे डोळ्यासमोर ठेवून हा वचननामा ठाणेकरांपुढे सादर केला आहे. ठाणेकरांचे अर्धे आयुष्य ट्रफिकमध्ये जात आहे. त्यामुळे त्यांना या त्रासातून मुक्त करण्याचे वचन आम्ही देत आहोत, असे मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी यावेळी सांगितले.

पहिली कृती ठाणे वाहतूक कोंडीमुक्त करण्याची

गेल्या वर्षी सुमित बाबा नावाच्या काँट्रक्टरने ठाण्यात एन्ट्री मारली आणि त्या सुमित बाबानेच शहराचा बट्टय़ाबोळ केला. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता आल्यानंतर सुमित बाबाला बाजूला करू आणि पहिली कृती ठाणे वाहतूक काsंडीमुक्त करण्याची करू, असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.

ठाण्याच्या विकासाचा रोड मॅप अत्याधुनिक रस्ते बनवणार

15 वर्षे काहीही होणार नाही असे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने रस्ते बनवणार. पंत्राटदाराने हयगय केल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करून जबर दंड ठोठावणार. गायमुख ते साकेत, खारेगाव कोस्टल रोडचे काम जलदगतीने पूर्ण करणार. गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत जाणाऱ्या उन्नत मार्गाला जोडण्याचे प्रयत्न करणार. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाला गती देणार. कोपरी-आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड उड्डाणपुलाची निर्मिती करणार. कोपरी ते पटणीदरम्यान खाडीवर नवीन पूल बांधणार. घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर करणार. ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी नवीन पार्पिंग प्लाझा उभारणार.

टँकरमाफियांना आळा घालणार

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ठाणे महापालिकेकरिता 1 हजार 116 एमएलडी पाणी इतर धरणातून आणण्याचा प्रयत्न करणार. ठाणे महापालिकेचे स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार. मुबलक आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणार.

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण

आरोग्य सेवा, आरोग्य पेंद्रे, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील सेवा सुधारणार. महापालिकेची जेनेरिक औषधांची धर्मवीर रुग्णसेवा उभी करून घरपोच औषधे देणार. अद्ययावत पॅन्सर रुग्णालय उभे करणार. रॅपिड बाईक अॅम्ब्युलन्स सेवा उभी करणार.

पर्यावरणपूरक बसेसचे जाळे

वाहतुकीचे प्रदूषण टाळण्यासाठी ई-बसेसचे जाळे. जागोजागी ई-चार्जिंग स्टेशनचा आराखडा. खासगी, सरकारी मालमत्ता आणि उद्योगनगरीत सौरऊर्जेचा वापर अनिवार्य करणार.

आधुनिक शिक्षण व्यवस्था

मुंबई विद्यापीठाचे ठाण्यातील उपकेंद्र अद्ययावत करून उच्च शिक्षणाची व्यवस्था. महापालिकेच्या जागेवर अद्ययावत शिक्षण संकुले.  प्रत्येक शाळेत डिजिटल शिक्षण. महापालिकांच्या शाळा बिल्डरांच्या घशात न घालता सीएसआरमधून इंटरनॅशनल स्कूलसारख्या अद्ययावत इमारती उभारणार. शहरातील प्रत्येक मैदाने खेळासाठी आरक्षित. देशी खेळांच्या व्यायामशाळा, उत्तम क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक. उत्तम पोषण आहार. स्पर्धांसाठी तयारी.

सांस्कृतिक ठाणे

प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगासाठी पृथ्वी थिएटरच्या धर्तीवर बॉक्स थिएटर बांधणार. चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजना. नाटकांच्या तालमीसाठी अल्पदरात जागा. गडकरी रंगायतनाचा पडदा पूर्वीसारखा करणार.

मुलांचे सुरक्षित भविष्य

महापालिकेच्या माध्यमातून काwशल्य विकास केंद्रे उभी करणार. भव्य अभ्यास ग्रंथालय उभारणार. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग. सायबर क्राईम फ्रॉड यासाठी विशेष जनजागृती प्रकल्प हाती घेणार.

दिवा, मुंब्य्राचा विकास

दिवा, मुंब्य्राचा यापुढे नियोजनबद्ध विकास करणार. रस्ते, गटार व ड्रेनेजची नवीन व्यवस्था निर्माण करणार. दिवा पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाने जोडणार. दिव्यात 24 तास महापालिका रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर उभारणार.

पाच वर्षे वृक्ष लागवडीची योजना

ठाण्याची एक्यूआय पातळी 247 ते 300 इतकी झाली आहे. या प्रदूषणामुळे ठाणेकरांना श्वसनाचे विकार होण्याची भीती आहे. पर्यावरण तज्ञांना घेऊन पुढील पाच वर्षांत मेगा वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेऊन पुढील 15 वर्षांत ठाणे शहर सावलीचे शहर म्हणून नावारूपाला आणणार.