
जिसकी लाठी, उसकी भैंस हे लोकशाहीत चालणार नाही. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. हा माज योग्य नाही. ‘तुळजाभवानी माते, यांना सद्बुध्दी दे’ असे म्हणत खासदार ओमराजे यांनी तुळजापुरातील पुजाऱ्यांनी आराखड्यासंदर्भात काही बदल सुचविले, या बदलांची नोंद घ्यावी, अशाही सूचना केल्या.
धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच श्री तुळजाभवानी मंदिर विकास आरखड्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान खासदार ओमराजे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार, खासदार ओमप्रकाश राजेनिबाळकर, आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
खासदार ओमराजे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 268 कोटी रुपयांच्या विकास निधीला स्थगिती दिली. या कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण किरण पुजार व जिल्हा नियोजन अधिकऱ्यांना कोणाच्या सांगण्यावरून माझ्या कामात आडकाठी आणू नका, मला माझ्या जुन्या रूपात आणले तर तुमची अडचण होईल, असा इशाराच खासदार राजेनिंबाळकर यांनी दिला. तुम्ही जे नियम मला दाखवत आहेत. त्या नियमानुसार तुम्हाला वागावे लागणार आहे. कायद्याच्या एकदम टोकावर जर तुम्ही बोट ठेवून चालणार असाल तर मीपण तुमच्याप्रमाणे नियमावर बोट ठेवूनच चालेल, असा इशारादेखील यावेळी खासदार राजेनिंबाळकर यांनी दिला.