शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी 18 फेब्रुवारीला; सुप्रीम कोर्टाने दिली नवी ‘तारीख’

supreme court

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात 18 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर नवीन ‘तारीख’ देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ही सुनावणी होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2023 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला पक्ष व निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.

शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह वापरण्यास मुभा देणारा निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे. याप्रकरणी मागील तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठाने नोव्हेंबरमध्ये अंतिम युक्तिवादासाठी सुनावणी निश्चित करून 21 जानेवारीची ‘तारीख’ दिली होती, मात्र त्या दिवशी सुनावणीच झाली नव्हती.