
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील अभ्यासू नेते म्हणून ओळख असलेल्या येचुरी यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सीताराम येचुरी यांचे हे जाण्याचे वय नव्हते. राजकारणातील पाच दशके त्यानी संघर्ष केला. विद्यार्थी चळवळी पासून सुरू झालेली त्यांची यात्रा कम्युनिस्ट पक्ष्याच्या महासचिव पदावर येऊन संपली. उत्तम वक्ता, अर्थ विषयाचा अभ्यासक, तत्वांशी तडजोड न करणारा नेता. डाव्या चळवळतील संयमी आणि प्रसन्न चेहरा असे येचुरी होते. इंडिया आघाडीच्या बैठकीत ते भेटत व मोकळे पणाने बोलत. सगळ्याच राजकीय पक्षात ते प्रिय होते. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक आहे. त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली.
छातीत न्युमोनियासदृश संसर्ग झाल्याने येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सीताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस होते. 1974 साल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)मध्ये प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच येचुरी सीपीआयएममध्ये सामील झाले. 1992 पासून ते सीपीआयएमच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. 2005 ते 2017 या काळात त्यांनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर खासदार म्हणून कार्य केले.
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी आंध्र प्रदेशमधील राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते. तर त्यांची आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या.