
महापालिकेतील बिल्डरधार्जिण्या सत्ताधाऱ्यांनी मुंबईतील मोकळी मैदाने, भूखंड आणि रुग्णालये धनदांडग्यांना कवडीमोल भावाने देण्याचा सपाटा लावला आहे. यातून पालिकेच्या शाळाही सुटताना दिसत नाहीत. कुंभारवाडा, वॉर्ड क्रमांक 220 मधील दुर्गादेवी शाळा आता कानपूर येथील एका संस्थेला दिल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या जागी पीपीपी (PPP) तत्त्वावर शाळा उभारण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. ‘जगातील सर्वात श्रीमंत महापालिका’ अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेने स्वतः या शाळेची पुनर्बांधणी न करता ती एका खासगी संस्थेला दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुंभारवाडा येथील पालिकेची दुर्गादेवी शाळा लोकप्रिय आहे. ही केवळ शाळा नसून त्या विभागाची ओळख होती. मराठी, उर्दू आणि गुजराती माध्यमाची ही शाळा 2022 साली पाडण्यात आली. मात्र, तेव्हापासून या शाळेचे काय झाले याबद्दल नागरिकांना काहीच माहिती नाही. एवढेच नव्हे तर, ‘सी’ वॉर्डमधील अधिकाऱ्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांनादेखील याबाबत काही माहीत नव्हते. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संपदा मयेकर यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शाळेचा मुद्दा पालिका सभागृहात उपस्थित केला. नुकतेच त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पत्रात, ही शाळा कानपूरच्या ‘वीरेंद्र स्वरूप मेमोरियल ट्रस्ट’ला पीपीपी मॉडेलवर देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुर्गादेवी शाळेचा भूखंड वीरेंद्र स्वरूप मेमोरियल ट्रस्ट या संस्थेला देण्यात आला आहे. संस्थेने एकरकमी अधिमूल्य (One-time Premium) आणि कायदेशीर व स्टेशनरी शुल्काची रक्कम भरली आहे. संस्थेने एसपीव्ही (SPV) कंपनीची स्थापना केली आहे. संस्थेच्या कन्सेशन ॲग्रीमेंटची पडताळणी करण्यात आली असून आवश्यक मुद्रांक शुल्क भरले आहे; फक्त नोंदणी (Registration) प्रक्रिया प्रलंबित आहे. दरम्यान, दुर्गादेवी पालिका शाळेचा पीपीपी तत्त्वावरील पुनर्विकास वादात सापडल्यानंतर पालिकेकडून फेरविचार समितीची स्थापना करण्यात आली आहे.
“दुर्गादेवी महानगरपालिका शाळा पालिकेने स्वखर्चातून बांधावी,” अशी मागणी नगरसेविका संपदा मयेकर यांनी केली. “कुंभारवाडा, गिरगाव परिसरातील मध्यमवर्गीयांना परवडणारे शिक्षण मिळावे यासाठी शाळा खासगी संस्थेच्या ताब्यात देऊ नये,” असे मयेकर म्हणाल्या.
आज आंदोलन, आदित्य ठाकरे सहभागी होणार
दुर्गादेवी पालिका शाळा खासगी विकासकाच्या घशात घालण्याच्या कारस्थानाविरोधात शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 आणि शाखा क्र. 220 च्या वतीने गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. दुर्गादेवी शाळा, कुंभारवाडा येथे सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन होईल.





























































