मुंबईतील चुनाभट्टी ते कुलाबापर्यंत बेस्टचे 11 लाख वीज ग्राहक असून यातील 3 लाख वीज ग्राहकांना अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे नवीन विद्युत स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर तत्काळ काढून या ठिकाणी आधीचे जुने बेस्टचे मीटर बसवावे, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली.
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेनेने कुलाब्यातील बेस्टच्या परिवहन भवनमध्ये अधिकाऱयांची भेट घेऊन ही मागणी केली. या वेळी शिवसेना नेते आणि बेस्ट अधिकाऱयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुंबईतील अनेक भागांत बेस्टचे वीज मीटर काढून त्या ठिकाणी अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवले जात आहेत.
बेस्टच्या ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता गुपचूपपणे हे काम सुरू आहे. स्मार्ट मीटर बसवल्याने रहिवाशांना जादा वीज बिल येत आहे. घरांसाठी स्मार्ट वीज मीटर लावण्यात येऊ नये, असे राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असताना अदानी कंपनीचे अधिकारी बेस्टच्या काही अधिकाऱयांना हाताशी धरून स्मार्ट मीटर बसवत आहेत.
…तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू
मुंबईत बसवलेले 3 लाख विद्युत स्मार्ट मीटर तत्काळ काढा आणि जुने बेस्टचे वीज मीटर बसवा. यापुढे कोणत्याही रहिवाशाला न सांगता स्मार्ट विद्युत मीटर बसवले तर बेस्ट कामगार सेना शिवसेना स्टाईलने अधिकाऱयांना धडा शिकवेल, असा इशारा दिला. या वेळी शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख महेश सावंत, बेस्टचे माजी अध्यक्ष अनील कोकिळ, विभागप्रमुख संतोष शिंदे, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी, मनोहर जुनरे, बेस्टचे अधिकारी बिलाल शेख, सुरेश मकवाना, चंदनकर, पुरोहित उपस्थित होते.