
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या दुरवस्थेवरून आक्रमक होत शिवसैनिकांनी सोमवारी दालनात धडक दिली आणि ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. पालिकेचे अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असे शिवसैनिकांनी ठणकावले. दालनाची दुरुस्ती आणि सुशोभिकरण तत्काळ झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाने प्रशासन हादरले आणि उपायुक्त अजितकुमार आंबी तिथे दाखल झाले. त्यांनी दोन दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
शिवसेना उपनेत्या व महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या नगरसेविका विशाखा राऊत, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, उपनेते नगरसेवक मिलिंद वैद्य, निशिकांत शिंदे, अर्चना शिंदे, हर्षला मोरे, विभाग संघटक आरती किनरे, गीता दळवी, माहीम विधानसभा निरीक्षक यशंवत विचले, शाखाप्रमुख अजित कदम, चंद्रकांत झगडे, अभय तामोरे, सिद्धार्थ चव्हाण, संजय केणी, विनायक देवरुखकर यांच्यासह शिवसैनिक ठिय्या आंदोलनात उतरले.
ठेवींवर श्वेतपत्रिक काढा
प्रशासकीय राजवटीत 91 हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या. त्याची श्वेतपत्रिक काढण्याची मागणी शिवसेनेने केली आहेच, पण भाजपच्या तीन आमदारांनीही श्वेतपत्रिक काढण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने कुठे कुठे खर्च केला त्याची आम्हाला माहिती देण्याची मागणी किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या देखभालीसाठी किती निधी दिला, अशी विचारणाही त्यांनी केली. शाळकरी मुलांना या दालनाकडे वळवण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल, प्रेझेंटेशन, मिनी थिएटर असे उपक्रम सुरू करण्याची सूचना विशाखा राऊत यांनी केली. या ठिकाणी एकच सुरक्षा रक्षक आहे. दालनातील प्रशासकीय पद रिक्त आहे, याकडे साईनाथ दुर्गे यांनी लक्ष वेधले.
शिवसेनेच्या पत्राकडे दुर्लक्ष
या दालनाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते पण या पत्राकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. महाराष्ट्र दिन जवळ आला आहे. तेव्हा तुम्ही दालनाचे काय करणार आहात, अशी विचारणा महेश सावंत यांनी केली. अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे मी केली होती, याची आठवणही महेश सावंत यांनी यावेळी करून दिली.
दोन दिवासांत दुरुस्तीचे काम सुरू करणार
शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्याने महापालिका प्रशासन हादरले. उपायुक्त अजितकुमार आंबी हे तातडीने दाखल झाले. त्यांनी शिवसैनिकांशी चर्चा केली. यावेळी तीव्र भावना व्यक्त करत शिवसैनिकांनी जाब विचारला. त्यावर पुढील दोन दिवसात दालनाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे सुशोभिकरण, नवे बदल, दुरुस्ती याबाबत महापालिकेकडून शुक्रवारी सादरीकरण देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.






























































