
‘अहिल्यानगरकरांनी सलग 25 वर्षे शिवसेनेला निवडून दिले आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शहराची जागा शिवसेनेला सुटली नसली, तरीदेखील महाविकास आघाडीला मिळालेली मते ही शिवसेनेचीच आहेत. आता मनपा निवडणुकीपूर्वी संघटन मजबुतीसाठी शिवसैनिकांनी संपर्क मोहिमांवर भर द्यावा,’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने विभागवार बैठकांचे सत्र सुरू केले आहे. याअंतर्गत सावेडी उपनगर विभागातील शिवसैनिकांच्या बैठकीत काळे बोलत होते. यावेळी शिक्षक सेनेचे प्रा. अंबादास शिंदे सर, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, युवासेनेचे प्रशांत भाले, प्रशांत पाटील, गौरव ढोणे, अहिल्यानगर विधानसभा युवासेना युवा अधिकारी आनंद राठोड, केशव दरेकर, सुजय लांडे, ऋतुराज आमले, विजय सानप, तुषार
लांडे, सुनील भोसले, अण्णा कोडम, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, ‘मनपा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी आपआपल्या भागामध्ये संपर्क मोहीम राबवावी. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ते जरी आज ‘गद्दार’ झाले असले, तरी सामान्य शिवसैनिक, शिवसेनेचा मूळ मतदार आजही जागेवर आहे. आजही अहिल्यानगरकरांना शिवसेनेकडून शहरविकासाची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. पिण्याचे पाणी, कचरा संकलन, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची रखडलेली अर्धवट कामे आदी प्रश्नांवर आवाज उठवा. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा,’ असे आवाहन किरण काळे यांनी शिवसैनिकांना केले.