
जे. जे. रुग्णालयाच्या आवारातच सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने या रुग्णालयाचे काम अगदी संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या रुग्णालयाच्या कामाची पाहणी करत रुग्णालयाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना केल्या.
शिवसेना उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर, प्रभाग क्र. 210 च्या नगरसेविका सोनम जामसुतकर तसेच जे. जे.चे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर जे. जे. रुग्णालय येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली. या प्रकल्पाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यात रुग्णांसाठी निर्माण होणाऱ्या आरोग्य सेवांबाबत सविस्तर माहिती आमदार मनोज जामसुतकर आणि नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी जाणून घेतली. या प्रकल्पामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अधीक्षक डॉ. संजय सुरासे, डॉ. अरुण राठोड, डॉ. दिलीप गवारी, शाखाप्रमुख सुहास भोसले तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे, ठेकेदाराचे प्रतिनिधी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या समन्वयातून हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यावर विशेष भर देण्यात आला.


























































