या सरकारवरच एस्मा लावला पाहिजे! LPG च्या वाढत्या किमती आणि खंडित पुरवठ्यावर अरविंद सावंत यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबवण्यात आल्याने त्यावर विसंबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”या सरकारवरच एस्मा लावला पाहिजे”, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

”मुंबई सारख्या शहरात गॅसशिवाय काही होऊ शकत नाही. हे काही गाव नाही की लाकडं आणून चूल पेटवू शकतील. गॅस 60 रुपयाने महागले, त्यात आता बाजारात गॅस सिलिंडर उपलब्ध नाहीये. काही जण सिलिंडर ब्लॅक करत आहे. त्यामुळे सरकारवर यावर लक्ष देणे गरजेचे आहे. यावर सरकारने निर्बंध आणले पाहिजे. या सरकारचे मित्र युद्ध करतायत ना त्याचेच हे परिणाम आहेत. सध्या सरकारची अशी अवस्था आहे की त्यांच्या विरोधातच एस्मा लावायला हवा”, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला.

युद्धाचा भडका आणखी तीव्र झाल्यास देशात स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ‘एस्मा’चा वापर करत सर्व तेल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एलपीजी विक्री केवळ घरगुती वापरासाठी करण्याचे या आदेशात म्हटले असून यामुळे व्यावसायिक वापरासाठी एलपीजी सिलिंडरची विक्री थांबवण्यात आली आहे.