
मतदारांशी प्रतारणा करत भाजप आणि मिंधे सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतात, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तसेच मुंबईच्या महापौरपदाबाबत सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे. महापौर महायुतीचाच होईल, असा दावा करण्यात येत आहे, तरमग सौदेबाजी का सुरू आहे? नगरसेवकांना लपवून ठेवणे, दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक फोडणे, विकत घेण्याचा प्रयत्न करणे, आमिषे, दबाव दाखवणे, असे प्रकार का सुरू आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला. अशा प्रकारांना मतदारांशी प्रतारणा असे म्हणतात.
एखादा उमेदवार एखाद्या पक्षाकडून पक्षाच्या चिन्हावर निवडून आला असेल तर त्याने पुढील पाच वर्षे त्याच पक्षात राहून काम करणे गरजेचे आहे. जर त्याला पक्षांतर करायचे असेल तर त्याने त्याच्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मात्र, भाजप आणि मिंध्यांच्याबाबतीत तसे दिसत नाही. दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक ते विकत घेतात, यालाच मतदारांशी प्रतारणा म्हणतात. हा मतदारांचा विश्वासघात आहे. भ्रष्ट पैशांच्या जोरावर, वारेमाप पैसा खर्च करत, दबाव, दहशतीच्या जोरावर इतर पक्षांच्या उमेदवारांना माघार घेण्यास लावत बिनविरोध उमेदवार निवडून आणणे आणि मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे, हीदेखील मतदारांशी प्रतारणा आहे.
भाजपचा महापौरपदावर दावा आहे. त्यामुळे दबावतंत्र वापरून, हॉटेल पॉलिटिक्सद्वारे काहीतरी वेगळे पदरात पाडून घेण्याचा मिंधेचा प्रयत्न आहे. त्यांना स्थायी समितीत जास्त रस आहे. सर्व आर्थिक व्यवहार तेथून होतात. याबाबत महापौरांना जास्त अधिकार नाहीत. ते शोभेचे पद आहे. इतर देशातील महापौरांना शहरांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा, रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार असतो. तसे आपल्याकडे नाही. त्यामुळे ठेकेदारी, कंत्राट, टेंडर असे घोटाळे करण्याची संधी असलेल्या पदांमध्ये त्यांना जास्त रस आहे.
केडीएमसीतील आमचे दोन नदरसेवक दिसत नाहीत. त्याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना होताना त्यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. ते उपस्थित नसल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे ते म्हणाले. आपण आपल्यामाणासंवर विश्वास ठवतो, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना मोठे करतो, त्यानंतर ते असे पक्षांतर करतात. त्यांचे बापच अशाप्रकारे पक्षांतरातून निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार? असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉच आहेत. त्यांच्यावर पक्षाची नजर आहे. त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. ताज लँडएन्डमध्ये कैद असलेल्या नगरसेवकांचेही फोन टॅप होत आहेत. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहेत.





























































