
युती होती तेव्हा भाजपच्या एका नेत्यानेच ईव्हीएम हॅक कसे करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक आपल्याला दाखवले होते, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या मुद्दय़ावरून त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतचोरीविरुद्धची लढाई निवडणूक आयोगाविरुद्ध असताना केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष मध्ये का पडतोय? असा सवाल या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. मतचोरीबद्दल निवडणूक आयोगाला ते जाब विचारायला निघाले होते. त्यांना पकडून बाजूला नेले गेले आणि अटक केली गेली हा एकप्रकारे दरोडाच आहे. केंद्र सरकारने केलेला तमाशा लांच्छनास्पद आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या कृतीमुळे देशाच्या लोकशाहीला बट्टा लागला, लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या झाली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मतचोरीचा मुद्दा देशभरात लावून धरला पाहिजे
मतचोरीचा मुद्दा देशभरात लावून धरला पाहिजे, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. पंतप्रधान आणि इतरांनी समोरासमोर बसून जे राहुल गांधींनी सादरीकरण दिले ते समजून घेतले पाहिजे. हा देशाच्या लोकशाहीचा मुद्दा आहे. सहा महिन्यांत 45 लाख मते वाढली असे परकला प्रभाकरही म्हणाले होते. ती आली कुठून? त्यामुळे सर्वांनी आपल्या पत्त्यावर आणखी मतदार घुसवले का ते तपासून पहावे, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. मतचोरीबाबत सबळ पुरावे सादर केल्यानंतरही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले गेले. हा कुठला उफराटा न्याय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भ्रष्टाचाऱ्यांना मुक्त रान हाच सरकारचा एककलमी कार्यक्रम
महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले, राज्यपालांना निवेदन दिले, पण कुणीही दाद द्यायला तयार नाही. कारण भ्रष्टाचार ही या सरकारची अपरिहार्यता झाली आहे. भ्रष्टाचाऱ्याला सोबत घेऊन राज्य चालवायचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना मुक्त रान द्यायचे असा सरकारचा एककलमी कार्यक्रम झालाय की काय अशी शंका येते. त्यामुळे आज शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले.
अमेरिका धमक्या देतोय. ते देशावरचे संकट आहे. पहलगाम मुद्दय़ावर सर्व पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी उभे राहिले तसेच सरकारनेही या संकटात सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे, पण मतचोरी कशी लपवता येईल याचा आटापिटा सरकार करत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीपूर्वी भेटलेल्या त्या दोन व्यक्तींना पुन्हा भेटायचेय
निवडणुकीपूर्वी दोन व्यक्ती शिवसेनेकडे आल्या होत्या आणि त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकून देतो असे सांगितले होते, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्यानंतर असे लोक भेटतात, पण त्या गोष्टी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत. आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचे नव्हते म्हणून त्यांच्या नादी लागलो नाहीत. पण आता पुन्हा ते भेटले तर त्यांच्याकडून या गोष्टी ऐकण्यात रस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
साष्टांग दंडवत घालतो…शिवसेनेच्या केसचा निकाल द्या
निवडणुकीतील घोटाळ्याबाबत न्यायालयात जाणार का, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयात जायला हरकत नाही. पण अजून शिवसेना पक्ष व चिन्हाबद्दलचाच निकाल लागलेला नाही. ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. तीन वर्षं झाली. चौथे वर्ष सुरू झाले. काय त्याला कालमर्यादा आहे की नाही! सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना बंधन टाकले आहे, तीन महिन्यांच्या आत निकाल लागला पाहिजे. तसे मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून, नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की, कृपा करून आपल्यासमोर लोकशाहीची जी केस सुरू आहे तिचीही एक कालमर्यादा ठरवून निकाल द्या. नाहीतर आता चौथे सरन्यायाधीश झाले. किती सरन्यायाधीश झाले पाहिजेत? किती दिवसात तो निकाल लागला पाहिजे, असे पुन्हा साष्टांग दंडवत घालून, त्यांची माफी मागून, नतमस्तक होऊन, त्यांच्यासमोर उठाबश्या घालून मी त्यांना विनंती करतो, असे उद्धव ठाकरे उद्विग्नपणे म्हणाले.
निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत का?
निवडणूक आयोग एकेक निर्णय स्वतःच्या मर्जीने घेत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून व्हीव्हीपॅट काढले. निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बिहारमधून वगळलेली नावे देण्यास आम्ही बांधील नाही असे आयोगाने न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग मोठा आहे का, असा सवालही त्यांनी केला.